अपूर्ण झोपेमुळे ‘ट्रेस हार्मोन’ वाढून खालावते प्रतिकारशक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 10:49 AM2021-08-24T10:49:26+5:302021-08-24T10:49:32+5:30

Incomplete sleep increases : नागरिकांनी संतुलित आहार, नियमित व्यायामासोबतच झोपही घेणे महत्त्वाचे असल्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिला जात आहे.

Incomplete sleep increases trace hormone and lowers immunity | अपूर्ण झोपेमुळे ‘ट्रेस हार्मोन’ वाढून खालावते प्रतिकारशक्ती

अपूर्ण झोपेमुळे ‘ट्रेस हार्मोन’ वाढून खालावते प्रतिकारशक्ती

googlenewsNext

- प्रवीण खेते

अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आता प्रत्येक जण घराबाहेर निघायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या दिनचर्येत बदल होत असून दगदग, ताणतणाव वाढत आहे. दैनंदिनी बिघडल्याने खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होत. त्याचा विपरीत परिणाम झोपेवर होत असल्याने ‘ट्रेस हार्मोन’ वाढत आहेत. त्यामुळे अनेकांची रोगप्रतिकारक शक्तीही खालावण्याचा धोका निर्माण झाला आहे. यापासून बचावासाठी नागरिकांनी संतुलित आहार, नियमित व्यायामासोबतच झोपही घेणे महत्त्वाचे असल्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिला जात आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात अनेकांनी रोगप्रतिकारशक्तीचा विकास करण्यासाठी प्रयत्न केले. वर्क फ्रॉम होम असल्याने वेळेवर जेवणासोबतच पौष्टिक आहारावर भर देण्यात आला होता. अनेकजण औषधे घेऊनही रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आता काेरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने बाजारपेठ पूर्ववत सुरू झाल्याने वर्क फ्रॉम होम देखील बंद झाले आहे. त्यामुुळे आता प्रत्येकाची जीवनशैली बदलली असून दगदगीचे जीवन झाले आहे. त्याचा परिणाम जेवणासाेबतच झोपेवरही झाला आहे. दिवसभराची दगदग, अपूर्ण झाेप यामुळे ट्रेस हार्मोन्स वाढत आहेत. त्याचा थेट परिणाम प्रतिकारशक्तीवर होताना दिसून येत आहे. उपजत रोगप्रतिकारशक्तीसाठी सर्वसमावेशक आहार, दररोज व्यायाम आणि आणि किमान सात तास झोप या तीन बाबी महत्त्वाच्या असल्याचे डाॅक्टर सांगतात.

 

रोगप्रतिकारशक्ती काय करते?

शरीरामध्ये होणारा कोणत्याही प्रकारचा जंतूसंसर्ग तसेच ॲलर्जीपासून संरक्षण करण्याचे काम रोगप्रतिकारशक्ती करते.

विविध गोष्टींमुळे शरीरात होणारे रिॲक्शन थांबविण्याचे काम रोगप्रतिकारशक्ती करीत असते.

त्यामुळे निरोगी शरीरासाठी रोगप्रतिकारशक्ती महत्त्वाची आहे.

मात्र, अलीकडे बदलते वातावरण, अपूर्ण आहार, कमी झोप तसेच व्यायामाचा अभाव यामुळे प्रतिकारशक्तीवर विपरीत परिणाम जाणवतो.

परिणामी जंतूसंसर्ग वाढण्याचा धोका वाढतो.

‘मेटाबाॅलिझम’साठी फायदा

निरोगी शरीरात पुरेशा झोपेचे मोठे महत्त्व आहे. त्यामुळे साधारणपणे सात ते आठ तास झोप आवश्यक आहे. झोपेमुळे शरीराची झालेली झीज भरून निघते. तसेच मेटाबॉलिझम अर्थात चयापचय क्रियाही झोपेमुळे साधारण राहते. अपूर्ण झोपेचे हृदय आणि मेंदूवर अधिक दुष्परिणाम दिसून येत असल्याचे अभ्यासक सांगतात.

अपुऱ्या झोपेचे तोटे

अपुऱ्या झोपेमुळे हृदयाचे विकार, रक्तदाब, रक्तातील साखर वाढणे, चिडचिड, नैराश्य येणे आदी शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या तक्रारी समोर येतात.

सकस आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि ताणतणावमुक्त जीवन या चार बाबींमुळे रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहते. यामध्ये झोपेचाही महत्त्वाचा रोल आहे. झोप जर पूर्ण झाली नाही तर ट्रेस हार्मोनमध्ये वाढ होते. परिणामी रोगप्रतिकारशक्ती कमी होते.

- डाॅ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ

Web Title: Incomplete sleep increases trace hormone and lowers immunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.