अवकाळी पाऊस रब्बीला पोषक; सोसाट्याच्या वा-याने फळगळ!
By Admin | Updated: November 16, 2014 23:51 IST2014-11-16T23:41:32+5:302014-11-16T23:51:59+5:30
येत्या चोवीस तासात विदर्भात पावसाची शक्यता.

अवकाळी पाऊस रब्बीला पोषक; सोसाट्याच्या वा-याने फळगळ!
अकोला : गत चार दिवसांपासून विदर्भात ढगाळ वातावरण असून, अधून-मधून विजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळत आहेत. ढगाळ वातावरण कायम असल्याने येत्या चोवीस तासात विदर्भात पावसाची शक्यता नागपूर वेधशाळेने वर्तविली आहे. या पावसामुळे रब्बी पिकांना दिलासा मिळत असला तरी सोसाट्याच्या वार्यामुळे फळ पिकांचे नुकसान होत आहे.
यावर्षी मान्सूनला विलंब झाला, मान्सून आल्यावर मध्येच पावसाने दडी मारली. पावसाचा हा खंड पावसाळा संपेपर्यंत कायम होता. परतीच्या पावसानेदेखील यावर्षी पाठ फिरवली. त्यामुळे खरीप पिकाचे नुकसान तर झालेच, जमिनीत ओलावा नसल्याने रब्बीचा पेरा घटला आहे; तथापि जिल्हय़ातील ज्या काही शेतकर्यांनी गहू, हरभरा, करडी आदी पिकांची पेरणी केली, त्या पिकांना पावसाची नितांत गरज आहे. अशावेळी गत चार दिवसांपासून जिल्हय़ात ढगाळ वातावरण असून, मंगळवारी जिल्हय़ात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. हा पाऊस दमदार नसला तरी तापमान घसरले असून, जमिनीत थोडाफार ओलावा निर्माण झाला आहे. या वातावरणाचा अल्पसा लाभ या पिकांना होण्याची शक्यता आहे. दरम्यान, रविवारी सकाळपासूनच संपूर्ण विदर्भात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. येत्या चोवीस तासात पाऊस येण्याची शक्यता नागपूरच्या वेधशाळेने वर्तविल्याने शेतकर्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.