वरिष्ठ राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेचे उद्घाटन
By Admin | Updated: February 28, 2015 00:40 IST2015-02-28T00:40:22+5:302015-02-28T00:40:22+5:30
अकोला येथे ६७ वी पुरुष व ३0 व्या महिला वेटलिफ्टिंग स्पर्धा.

वरिष्ठ राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेचे उद्घाटन
अकोला : महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग असोसिएशन व अकोला जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशनच्यावतीने आयोजित ६७ वी पुरुष व ३0 व्या महिला वरिष्ठ राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी वसंत देसाई क्रीडांगण बहूद्देशीय सभागृह येथे अँड. गिरीश गोखले यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष विजय मालोकार होते. क्रीडा अधिकारी श्याम देशपांडे, मनोज साकरकर, महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने, साई क्रीडा मार्गदर्शक विजय हरणे, बी.एम. दुबे, दिलीप मोहोड, राजेश घाडगे, सुनील कुंभार, बास्केटबॉल संघटनेचे सचिव पुरण गंगतिरे, जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव सुशील मोहोड व्यासपीठावर विराजमान होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक बी.एम.दुबे यांनी केले. अकोल्यात सप्टेंबर-२0१४ पासून लागोपाठ राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन होत आहे. २0१५ ची सुरुवातदेखील वेटलिफ्टिंग स्पर्धेनेच होऊन सलग दुसर्या महिन्यात राज्यस्तर स्पर्धेचे आयोजन होत असल्याने अकोल्यात वेटलिफ्टिंग खेळाला पोषक वातावरण असल्याचे सिद्ध झाल्याचे याप्रसंगी दुबे म्हणाले. उद्घाटक अँड. गोखले यांनी स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना विजयाच्या शुभेच्छा देऊन, येथील उपस्थित प्रत्येक खेळाडूने देशाचे नावलौकिक वाढविण्यासाठी मेहनत करावी, असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात मालोकार यांनी अकोल्यात क्रीडा क्षेत्राला उपयुक्त वातावरण असून, क्रीडा संघटनांनी बालकांमधील सुप्त क्रीडा नैपुण्य ओळखून त्या दृष्टीने तंत्रशुद्ध प्रशिक्षण द्यावे. यामुळे निश्चितच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होतील, असे मत व्यक्त केले. याप्रसंगी श्याम देशपांडे यांचे समयोचित भाषण झाले. मान्यवरांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर रणजित चिंचवाडे (कोल्हापूर विभाग) याचा सत्कार करण्यात आला. अकोल्याचा स्टार वेटलिफ्टर राष्ट्रीय पदक विजेता अक्षय बेंडवाल याच्या हस्ते बेंचप्रेस करू न स्पर्धेला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन नीलेश झाडे यांनी केले.आभार सुभाष वाघ यांनी मानले. स्पर्धेत राज्यभरातील वरिष्ठ महिला व पुरुष वेटलिफ्टर सहभागी झाले आहेत.