Immune and Preventive Measures Effective Drug on Corona - Dr. Sameer Lote | रोगप्रतिकारक शक्ती अन् प्रतिबंधात्मक उपाय ‘कोरोना’वर प्रभावी औषध - डॉ. समीर लोटे

रोगप्रतिकारक शक्ती अन् प्रतिबंधात्मक उपाय ‘कोरोना’वर प्रभावी औषध - डॉ. समीर लोटे

अकोला: जगभरात ‘कोरोना’चे संकट कायम आहे. अद्यापही संशोधकांना औषध निर्मितीत यश मिळाले नाही. अशा परिस्थितीत चांगली रोग प्रतिकारक शक्ती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावी औषध ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी ‘कोरोना’ला घाबरून न जाता रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे आणि वाषाणूंपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन श्वसन चिकित्सा तज्ज्ञ तथा ‘फेलो आणि माजी सल्लागार श्वसन चिकित्सा, सीएमसी, वेल्लोर’डॉ. समीर दीपक लोटे यांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून केले.


नागरिकांनी ‘कोरोना’ला घाबरण्याची गरज का?
योग्य खबरदारी घेतल्यास नागरिकांनी ‘कोरोना’ला घाबरण्याची गरज नाही. जगावर असा पहिलाच प्रसंग आला नाही. इतिहासात डोकावून बघितल्यास १९१८ मध्ये आलेल्या ‘स्पॅनिश फ्लू’मुळे यापेक्षाही भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. त्या तुलनेत कोरोना काहीच नाही. शंभरापैकी एक ते पाच लोक कोरोनामुळे प्रभावित झाल्याचे वास्तव आहे. त्यामुळे नागरिकांनी एकदम घाबरून जाण्याची गरज नाही.

‘कोरोना’ विषाणूंचा थेट फुप्फुसांवर ‘अटॅक ’ होतो का?
‘कोरोना’ हा विषाणू काही नवीन नाही; पण सध्या त्याच विषाणूच्या कुटुंबातील ‘कोव्हिड-१९’ या विषाणूचा जलद गतीने प्रादुर्भाव होत आहे. हा विषाणूदेखील श्वसनाद्वारेच शरीरात प्रवेश करतो. त्यानंतर तो फुप्फुसांमध्ये प्रवेश करतो आणि रुग्णाला निमोनिया होतो. सध्यातरी भारतात कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे एकदम घाबरून न जाता विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

‘कोरोना’चा धोका टाळण्यासाठी काय करावे?
प्रतिबंधात्मक उपाययोजनेतून कोरोनाचा धोका टाळणे शक्य आहे; पण त्याचसोबत नागरिकांनी स्वत:ची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी पुढील उपाययोजना कराव्यात.
१) नियमित व्यायाम करावा.
२) नियमित प्राणायाम व योग करावा.
३) ‘सीजनेबल’ भाजीपाल्यांसह फळांचे सेवन करावे.
४) विशेषत: ‘क- जीवनसत्व’ असणाऱ्या फळांचे सेवन करावे.

‘कोरोना’चा सर्वाधिक धोका कोणाला?
प्रामुख्याने ‘कोरोना’बाधित क्षेत्रातून आलेल्या किंवा ‘कोरोना’बाधित व्यक्तीच्या संपर्कात येणाºया व्यक्तींना याचा जास्त धोका आहे. शिवाय, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, (विशेषत: ५० ते ६० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील व्यक्ती) अशा व्यक्तींनाही ‘कोरोना’चा धोका नाकारता येत नाही.

‘कोरोना’विषयी नागरिकांची जबाबदारी काय असावी?
नियमित किमान २० सेकंद साबणाने हात धुवावेत, शक्य असल्यास अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरचा वापर करावा, डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार हात लावणे टाळावे, प्रत्येकानेच मास्क लावण्याची गरज नाही.

कोणत्या माध्यमातून ‘कोरोना’विषाणूची लागण होऊ शकते?
साधारणत: शिंकेद्वारे किंवा खोकल्यातून कोरोना विषाणू एका व्यक्तीकडून दुसºया व्यक्तीपर्यंत पोहोचतो; परंतु याशिवाय इतर वस्तूसह प्लास्टिकच्या माध्यमातूनदेखील कोरोना विषाणूची लागण होऊ शकते. प्लास्टिकवर जवळपास ७२ तास कोरोनाचे विषाणू राहत असल्याने त्याचा सर्वाधिक धोका आहे.

 

Web Title: Immune and Preventive Measures Effective Drug on Corona - Dr. Sameer Lote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.