मिक्सोपॅथी निर्णयाच्या निषेधार्थ आयएमएचे आजपासून साखळी उपोषण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:19 IST2021-02-05T06:19:02+5:302021-02-05T06:19:02+5:30

सीसीआयएम म्हणजेच सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन या आयुर्वेदिक शिक्षण आणि व्यवसाय नियमन करणाऱ्या संस्थेने भारताच्या राजपत्रात काही ...

IMA's chain hunger strike from today to protest mixopathy decision! | मिक्सोपॅथी निर्णयाच्या निषेधार्थ आयएमएचे आजपासून साखळी उपोषण!

मिक्सोपॅथी निर्णयाच्या निषेधार्थ आयएमएचे आजपासून साखळी उपोषण!

सीसीआयएम म्हणजेच सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन या आयुर्वेदिक शिक्षण आणि व्यवसाय नियमन करणाऱ्या संस्थेने भारताच्या राजपत्रात काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या एका परिपत्रकानुसार, आयुर्वेदिक शिक्षण घेतलेल्या स्नातकांना आधुनिक वैद्यक शास्त्रातील शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ आयएमए व मेडिकल स्टुडंट नेटवर्कतर्फे मंगळवारपासून दोनदिवसीय साखळी उपोषण करण्यात येणार आहे. सिव्हिल लाइन परिसरातील आयएमए प्रांगणात हे उपोषण राहणार असून, ३ फेब्रुवारी रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात साखळी उपोषण करण्यात येणार आहे. आयुर्वेद हे एक अतिशय प्राचीन शास्त्र असून, त्याचा निश्चितच अभिमान आहे; परंतु त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी त्यांचे शास्त्र सोडून आधुनिक वैद्यक शास्त्रात येऊन शस्त्रक्रिया कराव्यात या निर्णयाला आयएमएचा विरोध आहे. यासंदर्भात आयएमएतर्फे सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्र यामध्ये मोठा फरक आहे. त्यामुळेच परिपत्रकात नमूद करण्यात आलेल्या सूचनांचा विरोध आयएमए करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन ही आधुनिक वैद्यक शास्त्रातील अर्हता प्राप्त व्यावसायिकांची संघटना देशभर या विरोधात आंदोलन करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून साखळी उपोषण सुरू करण्यात येत असल्याचे आयएमएतर्फे सांगण्यात आले. समाजाच्या शास्त्रोक्त आणि प्रमाणित आरोग्य सेवेसाठी आणि आयुर्वेदाच्या सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टिकोनातून हा निर्णय शासनाने रद्द करावा, अशी मागणी आयएमएतर्फे करण्यात आली आहे. दोनदिवसीय साखळी उपोषणात पदाधिकारी व मेडिकल स्टुडंट नेटवर्कच्या समस्त सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयएमए अकोला शाखेचे अध्यक्ष डॉ. कमलकिशोर लढ्ढा, सचिव डॉ. अमोल केळकर, डॉ. पराग डोईफोडे यांनी केले.

Web Title: IMA's chain hunger strike from today to protest mixopathy decision!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.