पूर्णा नदीच्या पात्रातून पाण्याचा अवैध उपसा
By Admin | Updated: April 8, 2017 01:34 IST2017-04-08T01:34:32+5:302017-04-08T01:34:32+5:30
मलकापूर- पूर्णा नदीच्या पात्रात अवैध मोटरपंपाद्वारे सुरु असलेल्या पाण्याच्या उपशामुळे एप्रिल अखेरीस किंवा मेच्या सुरुवातीस शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

पूर्णा नदीच्या पात्रातून पाण्याचा अवैध उपसा
हनुमान जगताप - मलकापूर
मलकापूर येथे सद्यस्थितीत नगर परिषद पाणी पुरवठा विभागातर्फे आठ दिवसाआड होणारा पाणी पुरवठा समाधानकारक आहे; मात्र पूर्णा नदीच्या पात्रात अवैध मोटरपंपाद्वारे सुरु असलेल्या पाण्याच्या उपशामुळे एप्रिल अखेरीस किंवा मेच्या सुरुवातीस शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.
सुमारे पाऊण लाखावर लोकसंख्या असलेल्या मलकापूरवासीयांनी पूर्णा नदी पात्रातील हतनुर धरणाच्या बॅकवॉटरवर पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून राहावे लागते. धुपेश्वर येथून वाढीव पाणी पुरवठा योजनेद्वारा मलकापूरला पाणी पुरवठा केला जातो, तर तत्काळ किंवा अडीअडचणीत नळगंगा धरणाचे पाणी घेतल्या जाते. अलीकडच्या काळात शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. सन २०१२ च्या जनगणनेनुसार शहरात १३१७६ मालमत्ताधारक असल्याची माहिती आहे. त्यापैकी ५३३७ नागरिक, ४९ व्यापारी तर संस्थांनी नळजोडणी केल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे दोन हजारावर अवैध नळ कनेक्शन आहेत, असे सूत्रांनी सांगितले. पूर्णा नदीच्या पात्रातील हतनूर धरणाच्या बॅकवॉटरवर मलकापूरकरांचा पाणी पुरवठा अवलंबून आहे. त्याची अवस्था चांगली आहे; मात्र विद्यमान परिस्थितीत पूर्णा नदी पात्रातून अवैधरीत्या उपसा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अवैधरीत्या शेती पंपाद्वारे दररोज लाखो लिटर पाणी उचलले जात आहे. परिणामी, बॅकवॉटरची पातळी दिवसेंदिवस कमी होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट येऊ शकते.
बॅकवॉटर कमी झाल्यास उद्भणार पाणीटंचाई
रेतीचा उपसा व शेतीपंपाद्वारे नियमित पाणी उचलले गेल्यास पाणी पुरवठा योजनेच्या ‘जॅकवेल’ पासून बॅकवॉटरचे पाणी दूर जावून मलकापूरकरांसाठीची नळयोजना अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून आठ दिवसांनी का होईना समाधानकारक पाणी पुरवठा होतो; मात्र वॅकवॉटरची पातळी घटल्यास एप्रिल महिन्याच्या अखेरीस शहरवासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यावर वेळीच उपाययोजनांची गरज आहे.
पूर्णापात्रातील बॅकवॉटर कमी होणार, याची कल्पना आहे. त्यासाठी आम्ही सतर्क आहोत. त्या धरतीवर रेती उपसा थांबविण्यासाठी व अवैध शेतीपंपावर कारवाईसाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला आहे. पाणीटंचाई येऊ न देण्यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
- अॅड.हरीश रावळ, नगराध्यक्ष मलकापूर