अवैध लाकूडतोड जोरात
By Admin | Updated: May 10, 2014 23:44 IST2014-05-10T23:20:26+5:302014-05-10T23:44:13+5:30
नांदुरा तालुक्यात अवैध वृक्ष कटाई जोरात

अवैध लाकूडतोड जोरात
नांदुरा : नांदुरा तालुक्यात सध्या अवैध वृक्ष कटाई जोरात सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे. संबंधित प्रशासन हे सर्व उघड्या डोळ्याने पाहत असून यावर निर्बध लावण्यासाठी कुठलेही प्रयत्न करीत नसल्याचे शुन्य कारवाईवरुन दिसत आहे. पावसाळ्यात वाहन शेतामध्ये जात नसल्यामुळे तोडलेल्या वृक्षाची वाहतूक करता येत नाही. त्यामुळे सॉमिल मालक उन्हाळ्यात मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड करुन त्याची साठवणूक गोडावून मध्ये करतात. वास्तविक वृक्ष तोडतांना ते सुकलेली असले पाहिजे. त्याची तोडण्याची रितसर परवानगी घ्यावी लागते. मात्र शहरातील सॉमिल मालक शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून वाळलेल्या वृक्षासह हिरव्यागार वृक्षाची सुध्दा कटाई करत आहेत. साठवणीसाठी त्यांचे असलेले गोडावून लाकडामुळे खचाखच भरले असल्यामुळे गावाजवळील मोकळ्या लेआउटमध्ये बेवारस लाकडे टाकून साठवण करीत आहेत. मलकापूर रोडवरील नरहरी महाराज यांच्या आरामशीन समोरील एका लेआउटमध्ये अशीच लाकडांची बेवारस गंजी पडलेली आहे. शासन एकीकडे वृक्ष लावा वृक्ष जगवा असा संदेश देत आहे. तर दुसरीकडे शासनाचेच अधिकारी या वृक्षतोडीकडे जाणून बुजून दूर्लक्ष करुन शासनाच्या हरीत क्रांतीच्या उद्देशाला हरताळ फासत आहे.