अवैध सावकाराच्या घरावर छापा!
By Admin | Updated: May 14, 2017 04:28 IST2017-05-14T04:28:32+5:302017-05-14T04:28:32+5:30
शेतकर्यांची तक्रार: स्वाक्षरी केलेले कोरे मुद्रांक, धनादेश, खरेदीखते जप्त

अवैध सावकाराच्या घरावर छापा!
अकोला : अवैध सावकारी कायद्यानुसार तालुका उपनिबंधक सहकार विभागाच्या अधिकारी व अकोट फैल पोलिसांनी आपातापा रोडवरील संत कबीर नगरातील अवैध सावकाराच्या घरावर शनिवारी दुपारी छापा घातला. छाप्यामध्ये अवैध सावकाराकडील स्वाक्षरीसह कोरे मुद्रांक, कोरे धनादेशासह सावकारी व्यवहाराची नोंदवही, खरेदीखत जप्त केले. जप्त केलेल्या कागदपत्रांमधून कोट्यवधी रुपयांचा अवैध सावकारी व्यवसाय असल्याचे उघडकीस आले.
अंबिकापूर येथे राहणारे संतोष नानासाहेब इंगळे व मनकर्णा नागोराव पाचपोहे यांनी तालुका उपनिबंधक सहकार विभाग सुरेखा फुपाटे यांच्याकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार संतोष इंगळे यांच्या मालकीची गट नं. ९२ आपातापा शिवारामधील पाच एकर शेतीचा व्यवहार संतोष भोसलेसोबत २0१२ मध्ये झाला.
या शेतीवर त्याचाच ताबा आहे. संतोष भोसले हा इतरांच्या नावाने व्यवहार करीत असल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. तालुका उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी शनिवारी दुपारी संतोष भोसले यास नोटिस बजावून कारवाईस सुरुवात केली.
अवैध सावकारीचा व्यवसाय करणारा संतोष गोविंद भोसले याच्या संत कबीर नगरातील घरावर छापा घालून खरेदीखत, कोरे धनादेश स्वाक्षरी केलेल्या, कच्च्या पावत्या, नोंदवही, इसार पावती, नोटरी, पत्र स्वाक्षरी केलेले कोरे मुद्रांक अशी कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराची कागदपत्रे जप्त केली. शेतकर्यांकडील शेती गहाण ठेवून संतोष भोसले याने हे व्यवहार केले असल्याचे तपासात उघड झाले. ही कारवाई तालुका उपनिबंधक सहकार विभाग सुरेखा फुपाटे, सहकार अधिकारी डी. एस. सातरोटे, नरेंद्र धार्मिक, जे. एस. सहारे, तलाठी महेंद्र कदम, तलाठी उज्जवल मानकीकर, अकोट फैलचे ठाणेदार पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या पथकाने केली.
घरातून धारदार शस्त्र जप्त
सावकार संतोष भोसले शेतकर्यांना धाकदपट करून त्यांच्याकडून वसुली करतो आणि आणि बळजबरीने त्यांची शेती नावावर करतो. त्यासाठी शेतकर्यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवितो. त्याच्या घरावर घातलेल्या छाप्यात अमेरिकन बनावटीचे धारदार शस्त्रही मिळून आले असून, पोलिसांनी शस्त्र जप्त केले.
दुस-याच्या नावावर बळकावली शेतजमीन
सावकार संतोष भोसले याने शेतकरी संतोष इंगळे यांची गट नं. ९२ मधील ८१ आर शेती रवींद्र तेलंग (रा. केशव नगर), ८१ आर प्रताप शिवदास इंगळे यांच्या नावे करून नंतर स्वत:च्या नावावर उतरून घेतली. ३३ आर जमीन ही संतोष जनार्दन पागृत (रा. घुसर) यांच्या नावे केली आहे. मनकर्णा पाचपोहे यांची जमीन गट नं. ३१/२ यामधील १ हे. जमीन ही नीतेश श्रावण सिरसाट (रा. उगवा) व ४१ आर. हे दिनकर शेषराव इंगळे (रा. कोठारी वाटिका नं. ३, मलकापूर) यांच्या नावे करून नंतर भुपेंद्र मोरे व त्याच्या भावाच्या नावे केली असल्याचे तपासणीतून उघड झाले.