पातुर्डा घाटातून वाळूचे अवैध उत्खनन
By Admin | Updated: May 25, 2017 02:00 IST2017-05-25T02:00:26+5:302017-05-25T02:00:26+5:30
महसूल विभागाची डोळे झाक

पातुर्डा घाटातून वाळूचे अवैध उत्खनन
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव वैराळे : येथून जवळच असलेल्या तेल्हारा तालुक्यातील पूर्णा नदीच्या पात्रात येणाऱ्या तळेगाव पातुर्डा येथील गट क्रमांक ५४, ५५ आणि ६१ या रेतीच्या स्पॉटवरून ३५३३ ब्रास रेती ३५ लाख १५ हजार ३३५ रुपये किंमत ठेवून शासनाने लिलावात ठेवली होती; मात्र या घाटावरील रेती कुणीही लिलावात न घेतल्याने हर्रासी झाली नाही. याच घाटालगत असलेला बाळापूर तालुक्यातील हाता घाट दोन महिन्यांपूर्वी लिलावात गेला होता. दरम्यान, हाता घाटातील संपूर्ण रेती उचलण्यात आली आहे. सध्या आठ ते दहा दिवसांपासून लिलाव न झालेल्या तेल्हारा तालुक्यातील तळेगाव पातुर्डा वाळू घाटावरील वाळूचे अवैधरीत्या उत्खनन केले जात आहे. यामुळे शासनाच्या लाखो रुपयांच्या महसुलाला चुना लावण्याचे काम वाळू माफिया करीत आहेत.
बाळापूर तालुक्यातील हाता हा पूर्णा नदीच्या पात्रातील वाळू घाट दोन महिन्यांपूर्वी ठेकेदाराने लिलावात घेतल्यानंतर दोन महिन्यांत संपूर्ण वाळूचे उत्खनन केले. हाता घाटाला लागूनच असलेल्या तेल्हारा तालुक्यातील तळेगाव पातुर्डा या पूर्णा नदीच्या पात्रातील लिलाव न झालेल्या गट क्रमांक ५४, ५५ व ६१ या वाळू घाटात शासनाच्या नियमानुसार ३५३३ ब्रास वाळूचा साठा आहे. त्याची सरकारी किंमत ३५ लाख १५ हजार ३३५ रुपये ठरवून लिलावात ठेवण्यात आली होती; मात्र सदर वाळू घाटावर लिलावात कुणीही बोली न लावल्यामुळे या घाटाचा लिलाव झाला नाही. याच बाबींचा फायदा वाळू माफियांनी उचलणे सुरू केले असून, तळेगाव पातुर्डा या लिलाव न झालेल्या घाटातून मागील आठ ते दहा दिवसांपासून वीस ते पंचवीस वाहनांद्वारे वाळूचे उत्खनन अवैधरीत्या केले जात आहे.
या अवैध उत्खनन व वाळूची अवैध वाहतूकप्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी हाता येथील सरपंच आनंदा दामोदर यांनी जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदनाद्वारे केली आहे.
बाळापूर तालुक्यातील हाता घाटावरून मंजूर असलेल्या ब्रासपेक्षा जास्त वाळूचे उत्खनन करण्यासोबत घाटावर वाळू शिल्लक नसताना रॉयल्टी शिल्लक असल्याबाबत तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली असून, या रॉयल्टीवर तेल्हारा तालुक्यातील तळेगाव पातुर्डा लिलाव न झालेल्या घाटावरील वाळू उचलून नेल्या जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याबद्दल चौकशी करण्याचे आदेश संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी यांना देण्यात आले आहेत.
- संतोष शिंदे, तहसीलदार, बाळापूर