मोर्णा नदीपात्रात रेतीचे अवैध उत्खनन; दोन वाहने जप्त
By Admin | Updated: March 6, 2015 02:04 IST2015-03-06T02:04:19+5:302015-03-06T02:04:19+5:30
महसूल विभागाची कारवाई: गुन्हा दाखल.

मोर्णा नदीपात्रात रेतीचे अवैध उत्खनन; दोन वाहने जप्त
अकोला: शहरानजिक असलेल्या हिंगणा-म्हैसपूर येथे मोर्णा नदीपात्रात रेतीचे अवैध उत्खनन करून, वाहतूक करणारी दोन वाहने जप्त करण्याची कारवाई महसूल विभागाच्या पथकाने गुरुवारी केली. यासंदर्भात दोन्ही वाहन मालकांविरुद्ध जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हिंगणा-म्हैसपूर येथे मोर्णा नदीपात्रात रेतीचे अवैध उत्खनन करून, रेतीची वाहतूक सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांना गुरुवारी सकाळी प्राप्त झाली. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रभारी जिल्हा खनिकर्म अधिकारी सुनील पाटील, तहसीलदार संतोष शिंदे व पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता, मोर्णा नदीपात्रात १ हजार ५00 ब्रास रेतीचे अवैध उत्खनन करण्यात आल्याचे आढळून आले. तसेच अवैध उत्खनन करून रेतीची अवैध वाहतूक करताना एमएच ३0-एल-८३७ क्रमांकाचा मेटॅडोर आणि एमएच ३१ एम-४२५७ क्रमांकाचा ट्रक अशी दोन वाहने पकडून जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेली दोन्ही वाहने जुने शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली असून, मेटॅडोर मालक रितेश रणजित बलोदे व ट्रक मालक राजू ईश्वर बलोदे दोन्ही रा. बलोदे लेआऊट,हिंगणा यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.