'आयएल अ‍ॅण्ड 'एफएस' आर्थिक संकटात; महामार्ग चौपदरीकरण ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:16 PM2018-09-26T12:16:16+5:302018-09-26T12:21:00+5:30

इन्फ्रास्ट्रक्चर लिजिंग अ‍ॅण्ड फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड (आयएल अ‍ॅण्ड एफएस) आर्थिक संकटात सापडल्याने, गत काही महिन्यांपासून चौपदरीकरणाचे काम ठप्प झाले आहे.

'IL & FS' in financial crisis; Highway work stopped | 'आयएल अ‍ॅण्ड 'एफएस' आर्थिक संकटात; महामार्ग चौपदरीकरण ठप्प

'आयएल अ‍ॅण्ड 'एफएस' आर्थिक संकटात; महामार्ग चौपदरीकरण ठप्प

Next
ठळक मुद्देआयएल अ‍ॅण्ड एफएस ही मूळ कंपनी आणि तिच्या सर्व उप कंपन्या गत काही काळापासून कर्जांवरील व्याज चुकविण्यातही असमर्थ ठरत आहेत. सध्याच्या घडीला या कंपनीवर ९१ हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त कर्ज आहे. कंपनी तीन उप कंत्राटदारांची देणी चुकवू शकलेली नाही आणि त्यामुळे त्यांनी गत काही महिन्यांपासून काम थांबविले आहे.


लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: हाजिरा-देवगढ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ च्या अमरावती-चिखली टप्प्याच्या चौपदरीकरणाचे कंत्राट घेतलेल्या अमरावती चिखली एक्स्प्रेसवे लिमिटेड कंपनीचे पितृत्व असलेल्या आयएल अ‍ॅण्ड एफएस ट्रान्स्पोर्टेशन नेटवर्कस् इंडिया लिमिटेड या कंपनीची मूळ कंपनी असलेली इन्फ्रास्ट्रक्चर लिजिंग अ‍ॅण्ड फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड (आयएल अ‍ॅण्ड एफएस) आर्थिक संकटात सापडल्याने, गत काही महिन्यांपासून चौपदरीकरणाचे काम ठप्प झाले आहे.
हाजिरा-देवगढ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ पूर्वी सुरत-कोलकाता किंवा मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ म्हणून ओळखल्या जात होता. या महामार्गाच्या विदर्भातील टप्प्यांपैकी भंडारा-नागपूर आणि नागपूर-अमरावती या टप्प्यांचे चौपदरीकरण पूर्ण झाले असून, अमरावती-चिखली या टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. सदर कामाचे भूमिपूजन आॅक्टोबर २०१५ मध्ये झाले होते आणि कंत्राटातील अटीनुसार अमरावती चिखली एक्स्प्रेसवे लिमिटेडला सदर काम मे २०१९ पर्यंत पूर्ण करायचे होते; मात्र सध्याची स्थिती बघू जाता ते लक्ष्य गाठणे अशक्यप्राय दिसत आहे.
आयएल अ‍ॅण्ड एफएस ही मूळ कंपनी आणि तिच्या सर्व उप कंपन्या गत काही काळापासून कर्जांवरील व्याज चुकविण्यातही असमर्थ ठरत आहेत. गत काही दिवसांपासून शेअर बाजारात सुरू असलेल्या प्रचंड घसरणीमागे आयएल अ‍ॅण्ड एफएसचे आर्थिक संकट हे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. तीस वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या आयएल अ‍ॅण्ड एफएसच्या कर्जात गत तीन वर्षात ४४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्याच्या घडीला या कंपनीवर ९१ हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त कर्ज आहे. कर्जाचा भार कमी करण्यासाठी कंपनीने काही मालमत्ता आणि काही सुरू असलेले प्रकल्प विकायला काढले आहेत; मात्र सदर प्रक्रिया पूर्ण होण्यास किमान वर्षभराचा वेळ लागणार असल्याने तातडीने दिलासा मिळण्याची अजिबात शक्यता नाही.
आयएल अ‍ॅण्ड एफएसच्या नाजूक आर्थिक स्थितीमुळे अमरावती चिखली एक्स्प्रेसवे लिमिटेड ही कंत्राटदार कंपनी तीन उप कंत्राटदारांची देणी चुकवू शकलेली नाही आणि त्यामुळे त्यांनी गत काही महिन्यांपासून काम थांबविले आहे. परिणामी महामार्ग चौपदरीकरणाचे काम ठप्प पडले आहे. चौपदरीकरणासाठी जागोजागी रस्ता खोदून ठेवलेला असल्याने गत काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे आणि जोपर्यंत चौपदरीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यंत अपघात कमी होण्याची सुतराम शक्यता नाही.
सदर रस्त्याच्या चौपदरीकरणास सुरुवातीपासूनच ग्रहण लागले असून, २०१२ मध्ये सदर कंत्राट घेतलेल्या एल अ‍ॅण्ड टी इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीने, शासनाने भूसंपादन वेळेत पूर्ण न केल्याच्या कारणास्तव सदर काम सोडून दिले होते. त्यानंतर २०१५ मध्ये, एल अ‍ॅण्ड टीच्या कंत्राटापेक्षा तीन पट जास्त रकमेचे कंत्राट आयएल अ‍ॅण्ड एफएसला देण्यात आले होते. आता सदर कंपनी आर्थिक संकटात सापडल्याने सदर रस्त्याचे भाग्य केव्हा उजाडणार, असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.

Web Title: 'IL & FS' in financial crisis; Highway work stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.