पाया भक्कम असेल तर कुठेही संधी !
By Admin | Updated: April 2, 2015 02:16 IST2015-04-02T02:15:41+5:302015-04-02T02:16:13+5:30
चित्रपट अभिनेते भारत गणेशपुरे यांची लोकमतशी बातचीत.

पाया भक्कम असेल तर कुठेही संधी !
राजरत्न सिरसाट/अकोला: कोणतेही क्षेत्र असो, तुमचा पाया भक्कम असावा लागतो. यश मागे धावून येतं. तसंच चित्रपटसृष्टीचं आहे. या क्षेत्रातील अनुभव पाठीशी असणं गरजेचं तर आहेच, तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं काही तरी करता येतं का, हेही महत्त्वाचं आहे. त्याचं मार्केटिंग करण्याचं कौशल्यही अवगत असावं लागतं. या गुणांच्या आधारावरच अभिनय क्षेत्रात भरपूर संधी आहेत, हे नवोदित कलावंतानी जाणून घेण्याची खरी गरज आहे, अशी माहिती चित्रपट अभिनेते भारत गणेशपुरे यांनी दिली. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ५५ व्या विद्यार्थी स्नेहसंमेलनाला उपस्थित राहण्यासाठी सोमवारी भारत गणेशपुरे अकोला येथे आले होते. त्यावेळी त्यांनी खास लोकमतशी बातचीत केली.
प्रश्न- अभिनय क्षेत्रात तुम्ही कसे दाखल झालात ?
उत्तर - कृषी अभ्यासक्रमाची पदवी घेतल्यानंतर खरे तर मी नोकरी करावी, अशी माझ्या आई-वडिलांची इच्छा होती; पण मला अभिनयाची आवड असल्याने मी या क्षेत्राकडे वळलो. तसेही महाविद्यालयातूनच नाटकांतील अभिनयाचा मला अनुभव होता. याकरिता मी १९९७ मध्ये मुंबईला आलो. सुरुवातीला मला समांतर या मालिकेमध्ये काम मिळाले. आजमितीस या क्षेत्रात मला चांगले काम मिळत असले तरी माझा संघर्ष सुरू च आहे.
प्रश्न- विदर्भातील विद्यार्थ्यांना या क्षेत्रात संधी आहे का?
उत्तर - विदर्भातीलच काय, कोणत्याही प्रांतातील माणसाला या क्षेत्रात संधी आहे. त्यासाठी तुमचा पाया भक्कम असावा लागतो. या क्षेत्रातील अनुभव असणे गरजेचे आहे. विदर्भात अनेक चांगले कलावंत आहेत. त्यांच्याकडे चांगले कौशल्य आहे, पण हे कौशल्य इथे कामाचे नाही. जी त्यांची गरज आहे, तेच पाहिजे. त्यासाठी धैर्य, चिकाटी आणि जिद्द हवी आहे. तद्वतच तुम्ही वेगळं काय करू शकता, हे तुम्हाला दाखवावंच लागतं.
प्रश्न - या क्षेत्रात येणार्या विदर्भातील मुलांना प्रशिक्षण मिळेल का?
उत्तर- होय, विदर्भात अमरावती येथे अभिनय प्रशिक्षण संस्था उघडण्याचा माझा प्रयत्न आहे. या भागात कलावंत निर्माण व्हावेत, हा त्यामागील उद्देश आहे. कारण हे क्षेत्र संपूर्ण व्यावसायिक असूून, या क्षेत्रातील सिस्टीम समजणे अत्यंत गरजेचे आहे. ही सिस्टीम समजून घेण्यासाठीच वेळ घालवावा लागतो. त्यासोबत कुशल अभिनयाची जोड तर आवश्यकच आहे.
प्रश्न- विदर्भातील कलावंतानी या क्षेत्रात यावे, यासाठी तुमचे काही प्रयत्न?
उत्तर- या भागात खूप टॅलेंटेड, अनुभवी कलावंत आहेत. अनुभव असला तरी दाखवणार कोणाला, हा मूळ प्रश्न आहे. पुणे-मुंबईसारख्या शहरात महाविद्यालयांची स्नेहसंमेलनं, नाटकं, थिएटरला चित्रपट निर्माते जातात. त्याचा फायदा तेथील नवोदित कलावंतांना होतो. चित्रपटसृष्टीच मुंबईत असल्याने संधी मिळण्याची शक्यता असते.
प्रश्न- तुमच्याकडे सध्या कोणती कामे आहेत?
उत्तर- सध्या माझ्याकडे दोन मराठी चित्रपट असून, त्यामध्ये माझी मध्यवर्ती भूमिका आहे. प्रश्न- तुम्ही विदर्भातील असल्याचा काही त्रास झाला का? उत्तर- मुळीच नाही. हे क्षेत्रच पूर्णत: व्यावसायिक असल्याने तुमच्या उत्कृष्ट अभिनयकौशल्यालाच महत्त्व आहे. चित्रपट, टीव्ही मालिका वगैरे यामागे सारं काही मार्के टिंग आहे. त्यामुळे तुम्ही कोण आणि कुठले, याला काही स्थान नाही. मला विदर्भातील असल्याचा अजिबात त्रास झाला नाही, किंबहुना भेदभाव मुळीच झाला नाही. उलट चित्रपटसृष्टीमध्ये वर्हाडी भाषा रुजविण्यात मला यश आले आहे. ही भाषा आता आवडीने या क्षेत्रात बोलली जात आहे.