शासकीय कर्मचार्यांना ओळखपत्र बंधनकारक
By Admin | Updated: May 11, 2014 18:37 IST2014-05-11T18:03:24+5:302014-05-11T18:37:29+5:30
अधिकारी-कर्मचार्यांची सहज ओळख व्हावी, या उद्देशाने सर्वांना ओळखपत्र बंधनकारक केले

शासकीय कर्मचार्यांना ओळखपत्र बंधनकारक
अकोला- शासकीय कार्यालयामध्ये येणार्या नागरिकांना त्यांचे काम असलेल्या अधिकारी-कर्मचार्यांची सहज ओळख व्हावी, या उद्देशाने सर्वांना ओळखपत्र बंधनकारक केले आहे. हे ओळखपत्र सर्वांना सहज बघता येईल, अशा दर्शनी भागावर लावण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने ७ मे रोजी दिले आहेत.
नागरिक आणि ग्रामस्थ त्यांच्या कामाने नेहमी कोणत्या ना कोणत्या शासकीय कार्यालयात जातात. त्यांना काम असलेल्या अधिकारी किंवा कर्मचार्याची ओळख नसल्याने त्यांना नेमक्या कोणत्या कर्मचार्याला भेटावे किंवा अधिकार्यांकडे जावे, याबाबत माहिती नसते. कर्मचार्यांची ओळख पटविणारी कोणतीही माहिती कर्मचारी देत नाहीत किंवा ओळखपत्र मागितल्यानंतर कर्मचारी ते संबंधित नागरिकांना दाखवित नाही. यातून त्यांची फसगत होणे किंवा दलालांच्या हाती पडून नाहक त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व शासकीय कर्मचार्यांना ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. हे ओळखपत्र दर्शनी भागावर लावल्या जात नसल्याने नागरिकांची अडचण होत असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे सर्वच कर्मचार्यांनी त्यांचे ओळखपत्र दर्शनी भागावर लावणे बंधनकारक करणारा आदेश ७ मे रोजी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. पी.एस. मीना यांनी दिला आहे.
** ... तर होईल कारवाई
ओळखपत्र दर्शनी भागावर लावण्यात कर्मचारी व अधिकारी कुचराई करतात. त्यामुळे ओळखपत्र असूनही कर्मचार्याची ओळख होत नाही. अशा कर्मचार्यांवर वरिष्ठ अधिकार्यांनी कारवाई करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत.