अकोला ‘जीएमसी’च्या सात विद्यार्थ्यांच्या शोधप्रबंधांना ‘आयसीएमआर’ची मान्यता
By Atul.jaiswal | Updated: March 6, 2018 15:37 IST2018-03-06T15:35:29+5:302018-03-06T15:37:41+5:30
अकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पदवीपूर्व ‘एमबीबीएस’ च्या सात विद्यार्थ्यांनी २०१७ या शैक्षणिक वर्षात पाठविलेल्या शोध प्रबंधांना नवी दिल्ली येथील भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (आयसीएमआर)ची मान्यता मिळाली आहे.

अकोला ‘जीएमसी’च्या सात विद्यार्थ्यांच्या शोधप्रबंधांना ‘आयसीएमआर’ची मान्यता
अकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पदवीपूर्व ‘एमबीबीएस’ च्या सात विद्यार्थ्यांनी २०१७ या शैक्षणिक वर्षात पाठविलेल्या शोध प्रबंधांना नवी दिल्ली येथील भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (आयसीएमआर)ची मान्यता मिळाली आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रोत्साहीत करणे, यासाठी अद्ययावती ज्ञान मिळविण्यासाठी त्यांना तयार करणे, या उद्देशाने ‘आयसीएमआर’ वर्ष १९७९ पासून ‘शॉर्ट टर्म स्टूडन्टशिप’ (एसटीएस) हा उपक्रम संपूर्ण भारतातील पदवीपूर्व एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी राबवित आहे. ही संस्था पात्र व होतकरू विद्यार्थ्यांना विशेष्ट व मर्यादित संख्येत एसटीएस स्टूडन्टशिप देत असते. त्यानूसार शैक्षणिक वर्ष २०१७ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथील शुभम मिसाळ, वैशाली द्विवेदी, भाग्यश्री घुगे, काजल पाटील, निनाद काळे, आनंद क्रिष्णन, आकाश चौरेवार या सात विद्यार्थ्यांचे शोध प्रबंध आयसीएमआर-एसटीएस -२०१७ या उपक्रमाअंतर्गत निवडल्या गेले. सदर विद्यार्थ्यांनी मे २०१७ ते सप्टेंबर २०१७ या कालवधीत त्यांच्या गाईडच्या मार्गदर्शनाखाली संशोधनाचे काम पार पडले व त्यासंबंधीचा शोधप्रबंधाचा अहवाल अंतिम मंजुरीसाठी आयसीएमआरला पाठविले. तेथे या विद्यार्थ्यांच्या शोधप्रबंधांना मान्यता देण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला हे गत तीन वर्षांपासून या उपक्रमात सहभाग नोंदवित असून, या संशोधनात्मक उपक्रमाची जबाबदारी शरीरक्रिया शास्त्र विभाग प्रमुख डॉ. गजानन आत्राम सांभाळत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात यावर्षी आयसीएमआर-एसटीएस-२०१८ अंतर्गत ३० विद्यार्थ्यांच्या शोधप्रबंधांचा मसूदा आयसीएमआरच्या निवड प्रक्रियेकरीता सादर करण्यात आला आहे.
दरम्यान, शोधप्रबंधांना मान्यता मिळालेले विद्यार्थी व त्यांच्या मार्गदर्शकांचा अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्या हस्ते ‘कॉलेज कौन्सिल’मध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.