‘मी कर्जमुक्त होणारच’; शिवसेनेचे अभियान
By Admin | Updated: May 23, 2017 01:06 IST2017-05-23T01:06:47+5:302017-05-23T01:06:47+5:30
शेतकऱ्यांच्या घराघरांत पोहोचविणार कर्जमुक्तीचा अर्ज

‘मी कर्जमुक्त होणारच’; शिवसेनेचे अभियान
आशिष गावंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती मिळवून देण्याचा ध्यास घेतलेल्या शिवसेनेने आता शेतकऱ्यांसाठी ‘मी कर्जमुक्त होणारच’अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढत शेतकऱ्यांच्या घराघरात कर्जमुक्तीचा अर्ज पोहोचविण्याचे आदेश जारी केले आहेत. त्या पृष्ठभूमीवर जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, उपजिल्हाप्रमुख ते सर्कल प्रमुखांची फळी सरसावल्याची माहिती आहे.
शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानच्या माध्यमातून पक्ष बांधणी करणाऱ्या पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सेनेच्या सर्व नेतेमंडळीसह खासदार, आमदार, नगरसेवकांना कामाला लावले आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये शिवसंपर्क अभियान राबवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी १५ मे रोजी पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यांचा आढावा घेतला. नाशिक येथे १९ मे रोजी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात शिवसेनेने भाजप सरकारवर चांगलाच हल्लाबोल चढविला. त्याच मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी जुलै महिन्यापासून राज्यात ‘लाँग मार्च’ काढणार असल्याची भूमिका पक्ष प्रमुखांनी स्पष्ट केली. जुलै महिन्यातील ‘लाँग मार्च’साठी शिवसेनेने आता ‘मी कर्जमुक्त होणारच’अभियान हाती घेतले आहे. अभियान अंतर्गत शेतकऱ्यांकडून कर्जमुक्त ीचा अर्ज लिहून घेतला जाणार आहे. त्यामध्ये कुटुंबप्रमुखाचे नाव, गाव, कुटुंबातील एकूण सदस्य, व्यवसाय, शेती असेल तर किती एकर आहे, स्वमालकीची आहे का, कर्ज असल्यास संबंधित बँक किंवा सोसायटीचे नाव आदी माहिती संबंधित शेतकऱ्याला नमूद करावी लागणार आहे. यासोबतच सरकारला जाब विचारण्यासाठी दुसऱ्या पानावर १२ प्रश्नांची उत्तरे ‘होय’ किंवा ‘नाही’ याप्रमाणे लिहून सादर करावी लागतील. ही सर्व माहिती अर्जात नमूद केल्यानंतर सेनेचे संबंधित सर्कल प्रमुख, उपसर्कल प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुखांमार्फत जमा केले जाणार आहेत.
न्याय मागितला की हिणवल्या जाते!
उत्पादन कितीही झाले तरी पिकांना हमीभाव मिळत नसल्याने कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. कांदा, टोमॅटो, दूध रस्त्यावर फेकण्याची पाळी का यावी, याचा कधी विचार केला जातो का, असा सवाल थेट मुख्यमंत्र्यांना उद्देशून कर्जमुक्तीच्या अर्जात भावनिक साद घालण्यात आली आहे.
विरोधी पक्षात असताना मुख्यमंत्री साहेब तुम्ही दिलेली तुमची भाषणे ऐका. तुमची भाषणे ऐकूनच आम्ही तुमच्या हातात सत्ता सोपवली. तीन वर्षांत शेतकऱ्यांच्या समस्येत तसूभरही फरक पडला नाही. न्याय मागितला की ‘तरीही साले रडतात’ असे म्हणून हिणवल्या जाते.
शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण ठेवत शिवसेनेने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ‘मी कर्जमुक्त होणारच’ अभियान राबवण्याचे पक्ष प्रमुखांचे आदेश आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक सर्कलमध्ये शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना अर्ज दिल्या जातील. ते लिहून घेतल्यानंतर पक्षाकडे सादर केले जातील. त्यासाठी उपजिल्हाप्रमुख, तालुका प्रमुखांपासून ते सर्कल प्रमुख व गावातील शाखा प्रमुखांना कामाला लागण्याचे निर्देश आहेत.
-नितीन देशमुख,
जिल्हाप्रमुख शिवसेना