बालकांना हायपोथर्मियाची शक्यता !
By Admin | Updated: July 14, 2014 01:22 IST2014-07-14T00:23:52+5:302014-07-14T01:22:25+5:30
दमट व थंड तसेच उकाडा निर्माण करणार्या वातावरणामुळे जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशूंना हायपोथर्मिया आजार होण्याची शक्यता वाढली आहे.

बालकांना हायपोथर्मियाची शक्यता !
अकोला - दमट व थंड तसेच उकाडा निर्माण करणार्या वातावरणामुळे जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशूंना हायपोथर्मिया आजार होण्याची शक्यता वाढली आहे. बालकांना हायपोथर्मिया होऊ नये यासाठी खासगी रुग्णालय व सवरेपचार रुग्णालयात यासाठी उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये मात्र कुठल्याही उपाययोजना केली नसल्याची माहिती आहे. नवजात शिशूंच्या शरीराचे तापमान ३५ अंशापेक्षा कमी झाल्यास त्यांना हायपोथर्मिया हा जीवघेणा आजार होण्याची दाट शक्यता आहे. याची जाणीव जिल्हा स्त्री रुग्णालयातील वरिष्ठ महिला अधिकार्यांना असल्यावरदेखील त्यांनी यावर उपाययोजना करण्याकडे कानाडोळा केला आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयात महिलेची प्रसूती झाल्यानंतर नवजात शिशूला पहिले तीन ते चार दिवस याच ठिकाणी ठेवण्यात येते. त्यामुळे त्याला कुठल्याही आजाराचा संसर्ग होऊ नये म्हणून स्त्री रुग्णालय प्रशासनाने उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. मात्र, जिल्हा स्त्री रुग्णालयात शिशूंसाठी अशा दमट व थंड वातावरणामध्येही हायपोथर्मिया किट्स उपलब्ध करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे येथे जन्मास येणार्या बाळांना विविध आजारांचा धोका निर्माण झाला आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये दर दिवसाला ३0 ते ४0 प्रसूती होत असून, १0 ते १५ सिझर होतात. यानुसार स्त्री रुग्णालयात रोज ४0 ते ४५ बाळांचा जन्म होत असून, त्या तुलनेत सुविधा मात्र अत्यंत कमी आहेत. गंभीर नवजात शिशूंसाठी अत्याधुनिक कक्ष असला तरी इतर सुविधा पुरविण्यात येत नाहीत. यावेळी मार्च आणि मे महिन्यामध्ये झालेली गारपीट व अवकाळी पाऊस आणि त्यानंतर दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने नवजात शिशूंना हा आजार होण्याची शक्यता आहे. बालकांना विविध आजार होण्याचा धोका असल्याने जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासनाने त्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना लाखो रुपयांचा निधीही मिळतो. मात्र, नवजात शिशुंच्या आरोग्याबाबत जिल्हा स्त्री रुग्णालयातील अधिकारी गंभीर नसल्याचे यावरुन दिसून येत आहे.