नवीन तंत्राद्वारे काढली जाणार मोर्णेतील जलकुंभी
By Admin | Updated: July 14, 2017 20:22 IST2017-07-14T20:22:43+5:302017-07-14T20:22:43+5:30
मुंबईच्या क्लीन टेक कंपनीसोबत चर्चा - सभापती टाले आणि नगरसेवकांकडून जलकुंभीची पाहणी

नवीन तंत्राद्वारे काढली जाणार मोर्णेतील जलकुंभी
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: नवीन तंत्रज्ञानाद्वारे यंदा प्रथमच अकोल्यातील मोर्णा नदीतील जलकुंभी काढली जाणार असून, त्याबाबतची बोलणी मुंबईच्या क्लीन टेक कंपनीसोबत सुरू आहे. स्थायी समिती सभापती बाळ टाले यांच्या पुढाकारात महापालिका पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी उपमहापौर यांच्या कक्षात बैठक झाली.
मुंबईच्या क्लीन टेक कंपनीने बेंगळुरू, अहमदाबाद आणि केरळच्या तलावातील जलकुंभी काढण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण केल्याची माहिती कंपनीच्या प्रतिनिधींनी पदाधिकाऱ्यांना दिली. याबाबतचे व्हिडिओ आणि फोटो उपमहापौर यांच्या कक्षात पदाधिकाऱ्यांना दाखविले. त्यामुळे अकोल्यातील जलकुंभी काढण्याचे काम मुंबईच्या कंपनीकडे सोपविले जाण्याची शक्यता आहे.
महानगराच्या मध्यभागातून जाणाऱ्या मोर्णा नदीत जलकुंभीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने अकोलेकरांना डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. नदीकाठचे नागरिक आणि नगरसेवकांनी याबाबत तक्रारी केल्याने शुक्रवारी महापालिका स्थायी समिती सभापती बाळ टाले, नगरसेवक आणि महापालिकेच्या स्वच्छता पथकाने नदीकाठच्या घटनास्थळावर भेट देऊन जलकुंभीची पाहणी केली. जलकुंभीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, नागरिक मलेरियासारख्या रोगाने त्रासले आहेत. महानगरातील नदीकाठच्या नागरी परिसरातील तक्रारी वाढल्याने जलकुंभी काढण्यासाठी प्रशासनाने निविदा काढली; मात्र निविदेला फारसा प्रतिसाद न मिळाल्याने ही समस्या सोडविली गेली नाही. त्यामुळे नागरी तक्रारी ‘जैसे थे’ राहिल्यात. दरम्यान, ही समस्या दाखविण्यासाठी नगरसेवक अजय शर्मा यांनी पुढाकार घेतला. स्थायी समिती सभापती बाळ टाले, राजेश मिश्रा, हरीश काळे, गजानन चव्हाण, धनंजय धबाले, तुषार भिरड, माजी नगरसेवक हरिभाऊ काळे, सुरेश अंधारे, संतोष पांडे, सहायक आरोग्य अधिकारी अ. मतिन आदी प्रामुख्याने या पथकात उपस्थित होते.