पतीसह सासू, सासर्याला जन्मठेप
By Admin | Updated: August 26, 2014 22:00 IST2014-08-26T22:00:00+5:302014-08-26T22:00:00+5:30
पत्नीला रॉकेल टाकून पेटविल्याचे प्रकरण

पतीसह सासू, सासर्याला जन्मठेप
अकोला: पत्नीला अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एन. तांबी यांच्या न्यायालयाने सोमवारी पती, सासू व सासर्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
कारंजा तालुक्यातील काजळेश्वर उपाध्ये येथील रामेश्वर कोंडू चव्हाण (४५) यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या कांता नावाच्या मुलीचे पिंजर पोलिस ठाण्यांतर्गत येणार्या कानडी येथील गणेश लक्ष्मण पवार याच्यासोबत २0१0 मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर सासरच्यांनी ५ ते ६ महिने कांताला चांगली वागणूक दिली. नंतर मात्र तिचा पैस्यासाठी छळ झाला. काही दिवस तिला सासरी पाठविण्यात आले नव्हते; परंतु जातपंचायतीमध्ये तडजोड करून कांताला पुन्हा साररी पाठविले. त्यानंतर १२ मे २0१३ रोजी रात्री ९.३0 वाजताच्या सुमारास कानडी येथील पंकज सुरेश राठोड याने कांताच्या वडिलांना फोन करून ती जळाल्याचे सांगितले. त्यामुळे कांताचे वडील रामेश्वर चव्हाण व त्यांचे नातेवाईक देवीदास पवार, उमेश उपाध्ये, सीताराम जाधव, त्याची पत्नी कौशल्या रुग्णालयात भेटण्यासाठी आले. यावेळी कांताने तिच्या वडिलांना पती, सासू व सासर्याने अंगावर रॉकेल टाकून पेटविल्याची माहिती दिली. कांताही ९७ टक्के जळाली होती. रामेश्वर चव्हाण यांच्या तक्रारीनुसार, पिंजर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ४९८ (ए), ३२३ गुन्हा दाखल केला; परंतु उपचारादरम्यान कांताचा मृत्यू झाल्याने आरोपींवर भादंवि कलम ३0२ नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. या प्रकरणी न्यायालयाने सहा साक्षीदार तपासले. साक्ष व पुरावे ग्राहय़ मानून न्यायालयाने तिघाही आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी एक हजार दंड, दंड न भरल्यास दोन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील मंगला पांडे यांनी बाजू मांडली. आरोपीतर्फे अँड. मुन्ना खान होते.