शुभकर्ता लॉन्समधून दीड लाखांचे दागिने लंपास
By Admin | Updated: January 25, 2016 02:15 IST2016-01-25T02:15:25+5:302016-01-25T02:15:25+5:30
अकोला मध्यवर्ती बसस्थानकामागील घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल.

शुभकर्ता लॉन्समधून दीड लाखांचे दागिने लंपास
अकोला: मध्यवर्ती बसस्थानकामागे असलेल्या शुभकर्ता लॉन्समधील एका खोलीतून सुमारे एक लाख ६१ हजार रुपयांचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना रविवारी समोर आली. या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. खोलेश्वर येथील रहिवासी भूषण कृष्णमुरारी जोशी यांच्या लहान भावाचा शुभकर्ता लॉन्समध्ये विवाह होता. यासाठी त्यांनी लॉन्ससह काही खोल्या भाड्याने घेतल्या होत्या. यामधील १0६ क्रमांकाच्या खोलीमध्ये सुमारे १ लाख ६१ हजार रुपयांचे दागिने त्यांनी ठेवले होते. या खोलीला भूषणच्या आईने कुलूप लाऊन त्या नातेवाइकांमध्ये विवाहाच्या घाईगर्दीत निघून गेल्या. याचीच संधी साधत एका अज्ञात चोरट्याने खोलीत घुसून त्यामधील ७0 हजार रुपये किमतीचे तीन तोळे सोन्याचे मंगळसूत्र, ६0 हजार रुपये किमतीचे दुसरे एक मंगळसूत्र, पैंजन, रोख असा एकूण १ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. या प्रकरणी भूषण जोशी यांनी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन्स पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.