शेकडो हेक्टर शेतजमीन खरवडली

By Admin | Updated: July 29, 2014 20:18 IST2014-07-29T20:18:47+5:302014-07-29T20:18:47+5:30

दोन दिवसात कोसळलेल्या पावसाने शेतकर्‍यांच्या पिकांची नासाडीच नव्हे, तर शेतजमीनसुद्धा वाहून नेली आहे.

Hundreds of hectare farm land | शेकडो हेक्टर शेतजमीन खरवडली

शेकडो हेक्टर शेतजमीन खरवडली

आकोट: आकोट तालुक्यातील शेतकरी निसर्गाच्या चक्रव्यूहात अडकला आहे. दोन दिवसात कोसळलेल्या पावसाने शेतकर्‍यांच्या पिकांची नासाडीच नव्हे, तर शेतजमीनसुद्धा वाहून नेली आहे. नदी-नाल्यामधून वाहणार्‍या पाण्याने शेतीमार्गाने वाट काढल्याने शेतीचे नाल्यामध्ये रूपांतर झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसमोर मोठे संकट निर्माण झाले असून, मानसिक मनोबल खचले असल्याने चिंताजनक परिस्थिती आहे.
आकोट तालुक्यात ४0 हजार हेक्टर शेतीचे क्षेत्र आहे. यामध्ये पडीत जमीन क्षेत्र ४00 हेक्टर आहे. त्यापैकी वाहतीमध्ये असलेली शेकडो हेक्टर शेतजमीन पावसाच्या पुरात वाहून गेली आहे. आकोट-तेल्हारा मार्गावरील ५२ नदी-नाल्यांच्या काठावरील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील पठार, मोहाळी, खार, चंद्रिका, लेकरूवाडी यासह इतर नदी-नाल्याकाठच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.नदी-नाल्यामधील झाडेझुडपे काढण्यात आली नाही. त्यामुळे वाहत्या पाण्याला मार्ग मिळाला नसल्याने शेतीमध्ये पाणी शिरले. पाण्याच्या प्रवाहामुळे शेतीमधील मातीसुद्धा वाहून गेली आहे. त्यामुळे शेतीत मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे पुन्हा पेरणीकरिता जमिनीची मशागत करणे अशक्य झाले आहे. अनेक गावांमधील शेतकर्‍यांची पिके वाहून गेली. तर पाऊस थांबताच काळी म्हैस म्हणून ओळख असलेल्या कीटकांनी पर्‍हाटीचे शेत खल्लास करणे सुरू केले आहे. सोयाबीन पिकांचा तर गर्भातच मृत्यू झाला आहे. पावसाने सोयाबीन उगवण्यापूर्वी शेतीजमीन वाहून नेली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्‍यांनी पेरणी धरण्याआधीच पुरामुळे शेतात खड्डे पडल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे. खारपाणपट्टय़ातील मधुकर गावंडे, ज्ञानेश्‍वर गावंडे गोपाल गावंडे यांची शेती चांगलीच खरडून गेली आहे. सारंगधर गुरुजी, सुरेश गावंडे, प्रवीण गावंडे,विनोद वाघोडे यांच्यासह शेतकर्‍यांचे सोयाबीन पीक धोक्यात आले. प्रकाश गावंडे,चंदू तायडे यांच्यासह खारपाणपट्टय़ातील शेकडो शेतकर्‍यांच्या पर्‍हाटीचे नंबरचे नंबर खल्लास झाले आहेत. बाबाराव वाकोडे, लुणकरण डागा,गणेश कराड, रवींद्र बानेरकर, डिगांबर नागरे यांचेही मोठे नुकसान झाले आहे.
विशेष म्हणजे आधीच पाऊस वेळेवर न आल्याने शेतकरी अडचणीत सापडला होता. उशिरा पाऊस आल्याने पीक उगवण व उत्पादनावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली होती. महागडे बी-बियाणे पेरणी केल्यावर पर्‍हाटीवर कीटकांनी, सोयाबीनवर हरणांनी हल्ला चढविला, तर उगवलेल्या पिकांची रानडुकरांनी नासधूस केली आहे. शिवाय दोन दिवस धो-धो पाऊस झाल्याने पिकासह शेतजमीन वाहून गेली. त्यामुळे शेतकरी निसर्गाच्या चक्रव्यूहात अडकला असून, आर्थिक अडचणीने हतबल झाला आहे.

Web Title: Hundreds of hectare farm land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.