जगायचे कसे? घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी महागले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:13 IST2021-07-04T04:13:52+5:302021-07-04T04:13:52+5:30
गेल्या काही दिवसांत इंधनाच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. त्यामध्ये पेट्रोलच्या दराने केव्हाच शंभरी पार केली आहे, तर डिझेलचे ...

जगायचे कसे? घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी महागले!
गेल्या काही दिवसांत इंधनाच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. त्यामध्ये पेट्रोलच्या दराने केव्हाच शंभरी पार केली आहे, तर डिझेलचे दर शंभरीच्या घरात गेले आहेत. त्यामुळे महागाईचा आलेख चांगलाच वाढला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या नाकीनऊ आले असताना घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. गेल्या महिनाभरात गॅस सिलिंडर २५ रुपये ५० पैशांनी महागले आहे. आता हे सिलिंडर ८९० रुपयांना मिळत आहे. त्यामुळे एकीकडे जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असताना घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात होणारी वाढ सर्वसामान्यांना आर्थिक ताण देणारी ठरत आहे.
उज्ज्वला गॅस योजनेचे लाभार्थी वाऱ्यावर
केंद्र शासनाच्या वतीने मोठा गाजावाजा करून १ मे २०१६ रोजी देशात उज्ज्वला गॅस योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत गॅस जोडणी देण्यात आली होती. या योजनेंतर्गत लाभार्थींना पूर्वी बऱ्यापैकी सबसिडी मिळत होती. नंतर सबसिडीची रक्कम १८८ रुपयांवर आणली गेली. त्यामुळे ही सबसिडी न मिळाल्यातच जमा आहे. त्यामुळे लाभार्थींमध्ये संतापाची भावना आहे.
गावांत पुन्हा चुली पेटल्या
घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने ग्रामीण भागातील महिला आता सर्रास चुलीकडे वळताना दिसत आहेत.
गॅसचे भाव वाढत असल्याने सिलिंडरसाठीची रक्कम आणायची कुठून, असा आम्हा गरिबांपुढचा प्रश्न आहे. त्यामुळे चुलीवरच स्वयंपाक करावा लागत आहे, अशी प्रतिक्रिया काही महिलांनी दिली.
दिवसेंदिवस गॅसचे भाव वाढत असल्याने हे गॅस सिलिंडर घरातील कोपऱ्यात ठेवण्याची वेळ आली आहे. आता चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. त्यामुळे गॅसचे दर कमी होण्याची गरज आहे, असे काही महिलांनी सांगितले.
दाेन वर्षांपूर्वी गॅस सिलिंडर ५०० ते ६०० रुपयांना मिळत हाेता. वीज महाग असल्याने विजेच्या गिझरऐवजी गॅस गिझर खरेदी केला. आता गॅसही महाग झाला आहे. आंघाेळीला पाणी गरम करण्यासाठी बराचसा गॅस खर्च हाेतो.
- जया देशमुख, गृहिणी
कोरोनामुळे अगोदरच रोजगार मिळेनासा झाला आहे. त्यामुळे रोजचा दिवस कसा काढावा, असा प्रश्न पडला असताना सातत्याने गॅस सिलिंडरच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे घरखर्च भागवताना कसरत करावी लागत आहे.
- लक्ष्मीबाई गवई, गृहिणी
ऑगस्ट २०२० ते डिसेंबर २०२० मध्ये झालेली दरवाढ
घरगुती व्यावसायिक
ऑगस्ट ४६० १४९०
सप्टेंबर ५२० १५२०
ऑक्टोबर ५२० १५५०
नोव्हेंबर ६६४ १७००
डिसेंबर ६६४ १७४०
जानेवारी २०२१ ते जुलैमध्ये झालेली दरवाढ
घरगुती व्यावसायिक
जानेवारी ६६४ १४५०
फेब्रुवारी ७६४ १४६०
मार्च ७६४ १८००
एप्रिल ७८९ १८४५
मे ८२० १८४५
जून ८४० १८४५
जुलै ८९० १७४८