आदेशाचा घोळात घोळ, चालक वेठीस!
By Admin | Updated: April 18, 2016 02:14 IST2016-04-18T02:14:01+5:302016-04-18T02:14:01+5:30
राज्य परिवहन महामंडळातील रंग अंधत्व प्रकरण.

आदेशाचा घोळात घोळ, चालक वेठीस!
सचिन राऊत / अकोला
राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई कार्यालयाने चुकीचा ठराव घेऊन दिलेल्या आदेशानुसारच अकोला विभागात २६ चालकांना सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली होती. शासनाचे आदेश डावलून घेतलेल्या ठरावाच्या आदेशामुळेच चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चुकीचा ठराव घेणारे बडे अधिकारी मात्र अद्यापही कारवाईपासून दूर आहेत.
राज्य परिवहन महामंडळात कार्यरत ज्या चालकांचे वय ४0 वर्षांच्या वर झाले, त्यांची महामंडळाच्या मानसेवी डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्याचे आदेश आहेत. या आदेशावरून चालकांची आरोग्य तपासणी करून त्याचा अहवाल थेट महामंडळाला जातो. त्यानंतर या अहवालामध्ये ज्या चालकांना रंगअंधत्व आले, त्यांना नोकरीवरून कमी करण्यात आले होते; मात्र महामंडळाने शासनाचे आदेश डावलून घेतलेल्या ठरावानुसार या चालकांनी पर्यायी नोकरीसाठी अर्ज केला होता. या अर्जावरून २६ चालकांना राज्य परिवहन महामंडळाने सुरक्षा रक्षकपदी नेमणूक दिली. यामधील काही बड्या अधिकार्यांनी नावे चौकशी अधिकारी डोंगरे यांनी वगळल्याची माहिती आहे. महामंडळाच्या ज्या चुकीच्या ठरावावरून चालकांना सुरक्षा रक्षकपदी नेमणूक दिली होती, तो ठराव शासनाच्याच आदेशांना डावलून असल्याने सदरचा ठरावच मार्च २0१६ मध्ये रद्द करण्यात आला आहे. हा ठराव रद्द झाल्यानंतर रंगअंधत्व प्रकरणाच्या चौकशी अधिकार्यांनी या प्रकरणाची पोलिसांत तक्रार केल्याने, यामध्ये घोळात घोळ असल्याचा सवाल आता उपस्थित होत आहे. या २६ चालकांना सुरक्षा रक्षकपदाचे प्रशिक्षण या प्रकरणाचे चौकशी अधिकारी तथा सुरक्षा अधिकारी डी.वाय. डोंगरे यांनीच दिले असून, त्यांना पात्र ठरवून नियुक्तीही डोंगरे यांनीच केली आहे.