गुंडांचा हैदोस, रेस्टॉरंटमध्ये तोडफोड
By Admin | Updated: July 25, 2014 01:10 IST2014-07-25T01:10:06+5:302014-07-25T01:10:06+5:30
इन्कम टॅक्स चौकातील हॉटेल वैभवमध्ये तोडफोड करून सुमारे २५ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली.

गुंडांचा हैदोस, रेस्टॉरंटमध्ये तोडफोड
अकोला : जुने शहरातील गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी केशव नगरमधील एका इसमाच्या घरात हैदोस घालून सदर इसमाचा कान तोडला. त्यानंतर इन्कम टॅक्स चौकातील हॉटेल वैभवमध्ये तोडफोड करून सुमारे २५ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या प्रकरणी खदान पोलिसांनी सदर चारही जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना रात्री उशिरा अटक केली. जुने शहरातील भीम नगर येथील रहिवासी विलास शिरसाट, चंद्रकांत झटाले, सुबोध ढोके व विष्णू उमाळे यांनी यथेच्छ मद्यप्राशन करून केशव नगरमधील रामदास बर्वे यांच्या घरी जाऊन धिंगाणा घातला. बर्वे यांनी चारही गुंड प्रवृत्तीच्या युवकांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बर्वे यांच्या कानावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांचा कान तोडला. त्यानंतर या चारही आरोपींनी इन्कम टॅक्स चौकातील हॉटेल वैभवमध्ये तोडफोड केली. बाजूलाच असलेल्या झेराक्सच्या दुकानातील बोर्ड आणून सदरचे बोर्ड हॉटेलमध्ये फेकले. या युवकांच्या हैदोसामुळे हॉटेलमधील ग्राहकांसह रस्त्यावरील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. शहरासह जिल्हय़ात गावगुंडांचा हैदोस वाढला असून, पोलिसांचा कुठलाही वचक राहिला नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. चारही आरोपींनी केशव नगरसह गौरक्षण मार्गावर सशस्त्र धुडगूस घातला असताना पोलिसांनी मात्र त्यांना कुठलाही आवर घातला नाही. या गावगुंडांचा हैदोस संपल्यानंतर खदान पोलिसांनी त्यांना रात्री उशिरा भीम नगरमधून अटक केली. वरिष्ठ पोलिस अधिकारीही कागदी घोडे नाचविण्यात मग्न असून, त्यांचेही गावगुंडावर नियंत्रण नसल्याचे या घटनेवरून समोर आले आहे. रात्री उशिरा या आरोपींना अटक करण्यात आली असून, शुक्रवारी त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणी खदान पोलिसांनी सदर चारही आरोपींविरुद्ध कलम ३२६, ४५२, ५0६, ३९२, ४२७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.