फळबागांचे अतोनात नुकसान
By Admin | Updated: April 15, 2015 01:40 IST2015-04-15T01:40:35+5:302015-04-15T01:40:35+5:30
अकोला जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल ; केळी, आंबा, पपई, सत्रा, डाळिंब पिकांना फटका.

फळबागांचे अतोनात नुकसान
अकोला: जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील फळबागा उद्ध्वस्त झाल्या. केळी, आंबा, संत्रा, पपई, टरबूज, डाळिंब पिकांचे अतोनात नुकसान झाले. गतवर्षी मार्च महिन्यात गारपिटीचा फटका फळबागांना बसला होता. त्यानंतर अल्प आणि अनियमित पाऊस पडल्याने खरीप हंगामातील पिकं समाधानकारक झाली नाहीत. कपाशी, सोयाबीनचे उत्पादन कमालीचे घटले. त्यामुळे शेतकरी रब्बी हंगामातील पिकांकडे वळला. मात्र, अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले. दरम्यान, शनिवारी आणि रविवारी जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागांमध्ये गारपीटही झाली. बाश्रीटाकळी तालुक्यातील राजंदा शिवारात आंबा पिकांचे नुकसान झाले. पुनोती, निंबी वडगाव येथे डाळिंबाची झाडे उन्मळून पडली. सिंदखेड मोरेश्वर येथे वेलावर असलेल्या टरबुजाचे नुकसान झाले. ढेमशी पिकेही उद्ध्वस्त झाली. पुनोतीमध्ये डाळिंब पिकाचे नुकसान झाले. तेल्हारा तालुक्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे टरबूज, केळी, पपई पिके जमीनदोस्त झाली. अवकाळी पावसाचा फटका पातूर तालुक्यालाही बसला. तालुक्यातील चान्नी-चतारी, मळसूर, चांगेफळ, पिंपळखुटा, सायवणी परिसरातील आंबा, लिंबू, संत्रा पिकांचे नुकसान झाले. अकोला तालुक्यातील बाभूळगाव परिसरातील लिंबू व आंबा पिकांचे अतोनात नुकसान झाले. फळबागांचे नुकसान झाल्याने शासनाने तातडीने सर्व्हे करून मदत देण्याची मागणी शेतकर्यांमधून होत आहे. जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची सर्व्हे करण्यात येत आहे. कृषी व महसूल विभागाचे कर्मचारी सर्व्हे करीत आहेत. मात्र, पावसामुळे सर्व्हे करण्यात व्यत्यय येत आहे. तसेच सर्वेक्षणातील आकडेवारीही बदलत आहे.
असे आहे फळांचे क्षेत्र
फळे क्षेत्र
संत्रा ३ हजार १५0 हेक्टर
लिंबू २ हजार ३00 हेक्टर
मोसंबी १५ हेक्टर
पेरू १५२ हेक्टर
डाळिंब २५0 हेक्टर
चिकू ७५ हेक्टर
सीताफळ ७५ हेक्टर
आवळा ९0 हेक्टर
आंबा ६२५ हेक्टर