‘स्वीकृत’साठी घोडेबाजार तेजीत!
By Admin | Updated: March 31, 2017 02:06 IST2017-03-31T02:06:43+5:302017-03-31T02:06:43+5:30
शिवसेनेला धोबीपछाड देण्याच्या तयारीत राष्ट्रवादी

‘स्वीकृत’साठी घोडेबाजार तेजीत!
अकोला, दि. ३0-महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत यश-अपयश पदरात पडल्यानंतर आता किमान स्वीकृत नगरसेवक पदाच्या माध्यमातून सभागृहात संख्याबळ वाढविण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. नऊ सदस्यांच्या बळावर आघाडी स्थापन करणार्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेला धोबीपछाड दिल्या जाण्याचे संकेत आहेत. इच्छुकांच्या तीव्र अपेक्षा लक्षात घेता, आर्थिक घोडेबाजाराला प्रचंड ऊत आल्याची माहिती आहे.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी त्यांचा विजयाचा दावा केला होता. प्रत्यक्षात भाजपच्या लाटेत इतर राजकीय पक्षांची पुरती दाणादाण उडाल्याचे चित्र समोर आले. २0 प्रभागांतील ८0 जागांपैकी तब्बल ४८ जागा भाजपने पटकावल्या. उर्वरित १३ जागांवर काँग्रेस, शिवसेना-८, राष्ट्रवादी काँग्रेस-५, भारिप-बमसं-३,एमआयएम-१ व दोन अपक्ष नगरसेवकांचा विजय झाला. आता स्वीकृत नगरसेवक पदासाठी आपल्या पक्षातील किमान एका सदस्याची वर्णी लागावी, यासाठी तडजोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीत महापालिकेत पाच स्वीकृत नगरसेवकांची निवड केली जाते. भाजपचे संख्याबळ लक्षात घेता नियमानुसार भाजपच्या वतीने तीन तर काँग्रेसच्या एका सदस्याची स्वीकृत नगरसेवक पदासाठी निवड केली जाईल. उर्वरित एका सदस्यासाठी ज्या पक्षाचे संख्याबळ अधिक असेल, त्या पक्षाच्या सदस्याची निवड केली जाते. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने भारिपच्या तीन व एमआयएमच्या एका नगरसेवकाला सोबत घेऊन एकूण नऊ सदस्यांची लोकशाही आघाडी स्थापन केली, तसेच शिवसेनेनेदेखील एका अपक्ष नगरसेवकाची मदत घेऊन नऊ सदस्यांची आघाडी गठित केली आहे. अर्थातच, या ठिकाणी दोन्ही आघाड्यांचे संख्याबळ समान झाल्यामुळे सभागृहात ईश्वरचिठ्ठीचा पर्याय शिल्लक आहे.
राजकीय कूटनीती लक्षात घेता ऐनवेळेवर राष्ट्रवादीकडून सेनेला धोबीपछाड दिल्या जाण्याचे संकेत आहेत. तसे झाल्यास सभागृहात राष्ट्रवादीच्या एका सदस्याची स्वीकृत नगरसेवक पदासाठी निवड होण्याची शक्यता आहे.
मदन भरगड यांना संधी मिळेल का?
काँग्रेसचे माजी महापौर मदन भरगड यांना संपूर्ण शहराची जाण असून, महापालिकेचा अभ्यास आहे. त्यांचा पूर्वानुभव पाहता तूर्तास तरी पक्षाला अनुभवी व्यक्तीची कमतरता भासत असल्याचे चित्र आहे. सभागृहात अभ्यासपूर्ण मुद्दे मांडण्यासाठी पक्षाकडून भरगड यांना स्वीकृत नगरसेवकपदी संधी मिळेल का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
भाजपमध्ये खलबते
भाजपचे एकूण संख्याबळ लक्षात घेता, स्वीकृत नगरसेवक पदासाठी तीन सदस्यांची निवड केली जाईल. मनपा निवडणुकीत पक्षनिष्ठा जोपासून काम करणार्या तसेच उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांची भाजपमध्ये मोठी संख्या आहे. यामधून तीन सदस्यांची निवड करताना पक्षात चांगलीच खलबते सुरू आहेत.
"स्वीकृत"ची किंमत २५ लाख रुपये
मनपा निवडणुकीच्या रिंगणात मतदारांनी नाकारलेल्या इच्छुकांनी स्वीकृत नगरसेवक पदासाठी किंमत मोजण्याची तयारी पूर्ण केली आहे. यासाठी काही राजकीय पक्षाच्या नेत्यांपर्यंत अपेक्षित रक्कम पोहोचण्याची व्यवस्था करण्यात आली असून, ही रक्कम २५ लाखांपर्यंत असल्याची माहिती आहे.