'होम क्वारंटीन' कोरोनाबाधित रुग्णांचा मुक्तसंचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 20:03 IST2021-03-22T20:02:39+5:302021-03-22T20:03:35+5:30
Murtijapur News रुग्ण शहरात व ग्रामीण भागात बिनधास्त फिराताना आढळून आले आहे.

'होम क्वारंटीन' कोरोनाबाधित रुग्णांचा मुक्तसंचार
- संजय उमक
मूर्तिजापूर : कोरोना बाधित रुग्णांना पॉझिटिव्ह अहवालानंतर हेंडज येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पाच दिवस क्वारंटीन राहिल्या नंतर त्यांना पुढील दहा दिवस होम क्वारंटीन राहण्यास सांगितले जाते; परंतू असे रुग्ण शहरात व ग्रामीण भागात बिनधास्त फिराताना आढळून आले आहे. अशा रुग्णांमुळे अधिक प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मूर्तिजापूर शहरात नागरी व व्यापाऱ्यासांठी सतत कोरोना चाचणी शिबीर आयोजित करण्यात येत आहे. तसे नागरीकांना आवाहनही करण्यात आले आहे. त्या आवाहनाला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद पण मिळत आहे. अशावेळी अनेक जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान अशा बाधिताना नंतर हेंडज येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पाच दिसांठी क्वारंटीन करुन त्यांच्यावर उपचार देखील करण्यात येतात, उपचारानंतर रुग्णांना सक्तीने होम क्वारंटीन राहण्यास सांगितले जाते. परंतू आपण ठणठणीत असल्याच्या अविर्भावात होम क्वारंटीनच्या सक्तीला न जुमानता शहरात व ग्रामीण भागात मुक्त संचार करतांना आढळून येत असल्याने हा चिंतेचा विषय ठरला आहे. अशा रुग्णांमुळे तालुक्यात कोरोनाचा अधिक फैलाव होत असल्याचे बोलल्या जात आहे. या संदर्भात प्रशासनाने सक्ती कडक करण्याची मागणी होत आहे. सर्वत्र जमाव बंदी लागू करण्यात आली असता नागरीकांचे घोळके व दुकानात गर्दी होत असल्याचे चित्र आहे. अशा परीस्थितीला आळा घालून कोरोना नियंत्रणात आणता येत असताना प्रशासनाने या गोष्टीला गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
होम क्वारंटीन असलेल्या रुग्णांच्या घरोघरी जाऊन चेकिंग करण्यासाठी सात टिम तयार केल्या आहेत. होम क्वारंटीन असलेले रुग्ण बाहेर फिरताना आढळल्यास नागरीकांनी ही आमच्या निदर्शनास आणून द्यावी. दोषी व्यक्तीवर निश्चितच गुन्हा दाखल करण्यात येईल.
- अभयसिंह मोहिते
उपविभागीय अधिकारी, मूर्तिजापूर