सैलानीत दहा ट्रक नारळाची पेटली होळी
By Admin | Updated: March 6, 2015 01:48 IST2015-03-06T01:48:47+5:302015-03-06T01:48:47+5:30
जादूटोणा विरोधी कायद्याची सर्रास पायमल्ली.

सैलानीत दहा ट्रक नारळाची पेटली होळी
पिंपळगाव सैलानी (जि. बुलडाणा) : परंपरेनुसार होळी पंचमीला आज ५ मार्च रोजी १0 ट्रक नारळाची होळी पेटवून सैलानी यात्रेला प्रारंभ झाला. सैलानी बाबाचे पुजारी श.रफिक मुजावर, शे.हासन मुजावर, शे.नजिर मुजावर, शे.चाँद मुजावर, शे.रशिद मुजावर यांनी धूप, अगरबत्ती, नैवद्य दाखवून होळीची पूजा केली. त्यानंतर ही दहा ट्रक नारळाची होळी पेटविण्यात आली. दरम्यान, उपस्थित असलेल्या भाविकांनी या होळीत बिबे, लिंबु, खिळे ठोकलेले नारळ टाकून आपल्यावरील पिडा होळीत टाकून सैलानी बाबाचा गजर करीत हजारो भाविकांनी होळीला प्रदक्षिणा घातली. सैलानी यात्रेतील ही नारळाची होळी पाहण्यासाठी भाविकांसह परिसरातील शेकडो नागरिक सहभागी होतात. या होळीच्या कार्यक्रमात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अपर पोलीस उपअधीक्षक स्वेता खेडकर, पोलीस उपविभागीय अधिकारी शे. समिर, रायपूरचे ठाणेदार भूषण गावंडे, राम राजपूत, मोहन राठोड, चंदू राठोड यांनी चोख बंदोबस्त ठेवला. यावेळी बुलडाण्याचे तहसीलदार दीपक बाजड, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी लोखंडे उपस्थित होते. दरम्यान, आज प्रारंभ झालेल्या सैलानी यात्रेत जादूटोणा विरोधी कायद्याची सर्रास पायमल्ली झाल्याचे दिसून आले. मोठय़ा प्रमाणावर येथे भूत-भानामती झालेल्या मनोरूग्णावर उघडपणे आघोरी उपचार केल्या जात असल्याचे दिसून आले. अंगावरून नवा कपडा, बिबे, नारळ, लिंबु ओवाळून होळीमध्ये टाकल्या जात होते. हा प्रकार म्हणजे कायद्याची सर्रास पायमल्लीे होती.