विशेष खबरदारीमुळे एचआयव्हीबाधित कोरोनापासून दूरच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 10:48 IST2021-05-18T10:48:21+5:302021-05-18T10:48:29+5:30
Akola News : जिल्ह्यातील एचआयव्ही बाधित रुग्ण कोरोनापासून दूरच असल्याचे आकडेवारीतून निदर्शनास येत आहे.

विशेष खबरदारीमुळे एचआयव्हीबाधित कोरोनापासून दूरच!
अकोला : रोगप्रतिकारकशक्ती कमी असणाऱ्यांना कोरोनाचा जास्त धोका असतो. त्यामुळे एचआयव्ही बाधितांसाठी कोरोनाचा हा काळ संकटाचा आहे, मात्र विशेष खबरदारी घेतल्याने जिल्ह्यातील एचआयव्ही बाधित रुग्ण कोरोनापासून दूरच असल्याचे आकडेवारीतून निदर्शनास येत आहे. गत वर्षभरात जिल्ह्यातील केवळ सहा एचआयव्ही बाधितांचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला असून, हा आकडा दिलासादायक आहे. एड्ससह जीवन जगणाऱ्या रुग्णांमध्ये रोगप्रतिकारकशक्तीची कमी असल्याने त्यांना कोणताही आजार लवकर होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे या रुग्णांना आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. शिवाय, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ नये, यासाठी या रुग्णांना नियमित औषधोपचार सुरू असतो. अशा परिस्थितीतही कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून या रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे असते. मागील वर्षभरापासून जिल्ह्यातील एचआयव्ही बाधित रुग्णांनी आवश्यक ती खबरदारी घेतल्याने केवळ ६ जणांनाच कोरोनाची लागण झाली आहे.
अशी बाळगताहेत सावधगिरी
कोरोनापासून बचावासाठी मास्कचा वापर, नियमित हात धुणे
इतरांपासून सुरक्षित अंतर राखणे, शक्यतोवर घराबाहेर निघणे टाळत आहेत.
तसेच नियमित औषधोपचार घेत आहेत.
एचआयव्हीची औषध ठरतेय प्रभावी
रोगप्रतिकारकशक्ती टिकून राहावी, म्हणून एचआयव्ही बाधित रुग्णांना नियमित औषधे घ्यावी लागते. या औषधांमुळे एचआयव्ही बाधितांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती टिकून राहते. त्यामुळे कोरोनासारख्या विषाणूंचा संसर्ग होण्याची तसेच त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता कमी राहत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
एचआयव्ही बाधित रुग्ण - ५३४८
एचआयव्ही बाधित कोविड रुग्ण - ०६
एचआयव्ही बाधितांनी कोरोना काळात विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. जिल्ह्यातील रुग्ण तशी खबरदारी घेत आहेत, त्यामुळेच त्यांच्यातील कोविड संसर्गाचे प्रमाण कमी आहे. या रुग्णांवर रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी औषधोपचार सुरू आहे, त्याचाही फायदा होत असल्याचे दिसून येते.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला