वीज कंपनीच्या कर्मचा-याला मारहाण

By Admin | Updated: September 29, 2016 01:52 IST2016-09-29T01:52:58+5:302016-09-29T01:52:58+5:30

आकोट येथील घटना; संबंधितावर गुन्हा दाखल करुन कठोर कारवाईची मागणी.

Hit the power company employees | वीज कंपनीच्या कर्मचा-याला मारहाण

वीज कंपनीच्या कर्मचा-याला मारहाण

आकोट (जि.अकोला), दि. २८- तालुक्यातील अकोली जहाँगीर येथे वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्‍याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप करीत वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांनी २८ सप्टेंबर रोजी आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनवर धाव घेतली. संबंधितांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी कर्मचार्‍यांकडून करण्यात आली. त्याकरिता रात्री उशिरापर्यंत कर्मचारी पोलीस स्टेशन आवारात ठिय्या देऊन होते. अकोली जहाँगीर येथे अमोल अरुण महाजन हे लाइनमन म्हणून कार्यरत आहेत. ते २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता सुमारास आपले कर्तव्य बजावित असताना अकोली जहाँगीर येथील प्रभाकर गुलाबराव जायले यांनी त्यांच्याशी वाद घालून मारहाण केली, अशी तक्रार महाजन यांनी आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली. कर्मचार्‍याला मारहाण झाल्याची माहिती इतर कर्मचार्‍यांना होताच त्यांनीसुद्धा ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले. यावेळी मोठय़ा संख्येने कर्मचारी ग्रामीण पोलीस स्टेशनवर धडकले होते. त्यांनी संबंधितावर गुन्हा दाखल करुन कठोर कारवाईची मागणी केली. या प्रकरणी वृत्तलिहिपर्यंत तक्रार दाखल करुन घेण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Hit the power company employees