‘हिंगणा’ हगणदरीमुक्तीकडे!
By Admin | Updated: December 25, 2016 02:44 IST2016-12-25T02:44:11+5:302016-12-25T02:44:11+5:30
जिल्हाधिका-यांनी केला होता धिक्कार.

‘हिंगणा’ हगणदरीमुक्तीकडे!
संतोष येलकर
अकोला, दि. २४-गावातील गोदरी पाहून चिडलेल्या जिल्हाधिकार्यांनी गावाचा धिक्कार केल्यानंतर जिल्हय़ातील पातूर तालुक्यातील हिंगणा गावातील ग्रामस्थांनी गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी सुरू केलेल्या सकारात्मक प्रयत्नात गावात शौचालय बांधकामांना गती आल्याने हिंगणा गावाची हगणदरीमुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत लोकसहभागातून करण्यात आलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी गत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्हाधिकारी जी. श्रीकांत पातूर तालुक्यातील हिंगणा येथे गेले होते. त्यावेळी गावातील गोदरी पाहून चिडलेल्या जिल्हाधिकार्यांनी ग्रामस्थांसमोर तीव्र नाराजी व्यक्त केली. गाव हगणदरीमुक्त नसल्याने, आणि गावातील नागरिक उघड्यावर शौचास जात असल्यामुळे ह्यतुमच्या गावाचा धिक्कार असोह्ण अशा शब्दांत जिल्हाधिकार्यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकार्यांनी व्यक्त केलेली नाराजी ग्रामस्थांनी सकारात्क दृष्टीने मनावर घेतली आणि गाव हगणदरीमुक्त करण्याचा संकल्प केला. एकत्र आलेल्या ग्रामस्थांनी गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी पुढाकर घेत, गावात शौचालयांचे बांधकाम सुरू केले. एकूण ९५ घरे असलेल्या हिंगणा गावातील ५0 घरांमध्ये शौचालय बांधण्यात आले असून, २१ घरांमध्ये शौचालयांचे बांधकाम सध्या सुरू आहे. गावात शौचालय बांधकामांना गती आल्याने, हगणदरीमुक्त गावाच्या दिशेने हिंगणा गावाची वाटचाल सुरू झाली आहे.
हगणदरीमुक्त गावासाठी हिंगणा येथे ग्रामस्थांनी सुरू केलेल्या प्रयत्नात शौचालय बांधकामांना गती आली आहे. त्यामध्ये शौचालय बांधकामासाठी हिंगणा येथील स्वप्ना विठ्ठल उजाडे या महिलेने त्यांच्या मुलीच्या कानातील सोन्याचे रिंग विकले आणि घरात शौचालयाचे बांधकाम सुरू केले.
गावातील गोदरी पाहून जिल्हाधिकार्यांनी व्यक्त केलेली चीड हिंगणा येथील ग्रामस्थांनी सकारात्मक घेऊन, गाव हगणदरीमुक्त करण्याचा निर्धार केला. त्यासाठी गावात शौचालय बांधकामांना गती आली असून, लवकरच हे गाव हगणदरीमुक्त होणार आहे. शौचालय बांधकामासाठी पुढाकार घेतलेल्या ग्रामस्थांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले आहे.
- संजय खडसे,
उपविभागीय अधिकारी, बाळापूर.