वाग्दत्त जोडप्यास मारहाण करून लुटणारा गजाआड
By Admin | Updated: November 8, 2016 02:17 IST2016-11-08T02:17:39+5:302016-11-08T02:17:39+5:30
तीन आरोपी फरार; खरप परिसरातील घटना

वाग्दत्त जोडप्यास मारहाण करून लुटणारा गजाआड
अकोला, दि. ७- मुंबई येथे नोकरीस असलेल्या आणि दिवाळीनिमित्त अकोल्यात आल्यानंतर वाग्दत्त वधूसोबत खरप परिसरातून जात असताना या परिसरातील रहिवासी असलेल्या चौघांनी या जोडप्यास मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम व सोन्याची चेन लुटल्याची घटना रविवारी रात्री घडली. या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी एकास अटक केली असून तीन आरोपी अद्यापही फरार आहेत.
कार्ला येथील रहिवासी विवेक वानखडे हे मुंबई येथे प्लंबिंग वर्क्सचे कामकाज करतात. त्यांचे अकोल्यातीलच एका मुलीसोबत साक्षगंध झाले असून दोन महिन्यांनी विवाह सोहळा आहे. वानखडे दिवाळीला अकोल्यात आल्यानंतर ते त्यांच्या वाग्दत्त वधूला घेऊन खरप परिसरातून जात असताना त्यांना खरप येथील रहिवासी संजय अवधूत इंगळे, राष्ट्रपाल व त्यांच्या दोन साथीदारांनी अडविले. त्यानंतर शस्त्र आणि पाइपचा धाक दाखवून विवेक वानखडे यांच्या गळय़ातील ५0 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन काढून घेतली. त्यानंतर पर्स घेऊन त्यामधील १ हजार रुपये रोख, एटीएम कार्ड, नेट बँकिंगचे पासवर्ड आणि वाहन चालक परवाना काढून घेतला. यासोबतच त्यांना पाठीवर व चेहर्यावर मारहाण केली. लुटमार केल्यानंतर हे चोरटे फरार झाले. त्यानंतर वानखडे यांनी सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून पोलिसांनी चौघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३९४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. यामधील संजय इंगळे या आरोपीस अटक करण्यात आली असली तरी लुटमार करणारे तीन आरोपी अद्यापही मोकाट आहेत.
फ्लेक्सवरील फोटोमुळे लुटारू जेरबंद
विवेक वानखडे यांना मारहाण करून त्यांची सोन्याची चेन व पैसे घेऊन लुटारू पळून गेले. त्यानंतर वानखडे हे सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी खरप येथून परत निघाले असता त्यांना न्यू तापडिया नगरजवळ लावलेल्या शुभेच्छा फलकावर दोन लुटारूंचे छायाचित्र दिसले. या प्रकाराची माहिती सिव्हिल लाइन्स पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी फलकावरील दोघांची ओळख पटवून यामधील संजय इंगळे याला अटक केली, तर राष्ट्रपाल नामक लुटारूचा शोध सुरू केला आहे. शुभेच्छा फलकावरच्या छायाचित्रामुळे या लुटमारीचा काही वेळातच पर्दाफाश झाला.