रेल्वेची हेल्पलाईन ठरतेय कुचकामी
By Admin | Updated: November 15, 2014 00:19 IST2014-11-15T00:19:44+5:302014-11-15T00:19:44+5:30
प्रवाशांच्या प्रश्नांचे निरसन करण्यास अकोला रेल्वे स्थानक प्रशासनाची टाळाटाळ.

रेल्वेची हेल्पलाईन ठरतेय कुचकामी
अकोला : रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकाबाबत नागरिकांना त्वरित व सुलभरीत्या माहिती मिळावी, यासाठी रेल्वे प्रशासनाच्यावतीने चालविल्या जाणारी ह्यहेल्पलाईन- १३९ह्ण नागरिकांच्या प्रश्नाचे निरसन करण्यास कुचकामी ठरत असल्याची प्रचिती गुरुवारी मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेसची वाट पाहणार्या प्रवाशांना आली. गुरुवारी मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस आपल्या निर्धारित वेळेपक्षा ६ तास उशिराने अकोला रेल्वे स्थानकावर पोहोचली. विशेष बाब म्हणजे, गाडी उशिरा येत असल्याची उद्घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांना सहा तास प्लॅटफार्मवर ताटकळत उभे रहावे लागले. प्लॅटफार्मवर उभ्या अनेक प्रवाशांनी याबाबत रेल्वेद्वारा चालविल्या जाणारा हेल्पलाईन क्रमांक १३९ वर विचारपूस करण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद न मिळाल्याने आणखीनच मनस्ताप करण्याची वेळ प्रवाशांवर आली. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस आपल्या मूळ स्थानकावरूनच तीन तास उशिराने निघाल्याने मुंबईला पोहोचण्यास तिला विलंब झाला. परिणामी, परतीच्या प्रवासादरम्यान ही गाडी मुंबईवरूनच उशिरा निघाल्याने ती अकोला रेल्वे स्थानकावर आपल्या निर्धारित वेळेपेक्षा सहा तास उशिराने पोहोचली. मात्र, याबाबत कोणतीच उद्घोषणा न झाल्याने गाडीची वाट पाहणार्या प्रवाशांना अधिकच मनस्ताप सहन करावा लागला. विचारणा कक्ष व कंट्रोल रूममधील अधिकार्यांना याबाबत विचारणा करून थकलेल्या अनेक प्रवाशांनी रेल्वेच्या हेल्पलाईन क्रमांक डायल करून विचारणा केली असता, पलीकडून बोलणारी व्यक्ती प्रतिसादच देत नसल्याची प्रचिती प्रवाशांना आली. रेल्वे प्रशासनाला वेळोवेळी सूचना देऊन विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार्या अकोल्यातील विविध संघटना रेल्वेच्या हेल्पलाईनबाबत अनभिज्ञ कशा? हा प्रश्नदेखील याठिकाणी उपस्थित होतो.