अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतक-यांना मदत द्या!
By Admin | Updated: February 14, 2015 01:22 IST2015-02-14T01:22:57+5:302015-02-14T01:22:57+5:30
शेतकरी जागर मंचाची जिल्हाधिका-यांकडे मागणी.

अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतक-यांना मदत द्या!
अकोला : जिल्हय़ात मंगळवारी रात्री वादळी पावसाने तडाखा दिल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा सर्व्हे करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी जागर मंचाच्यावतीने शुक्रवारी निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली.
मंगळवार, १0 फेब्रुवारीच्या रात्री १२ वाजताचे सुमारास वादळी वार्यासह आलेल्या पावसामुळे शेतकर्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. गहू, हरभरा, कांदा, तूर, ओवा या पिकांसह संत्रा, लिंबू, आंबा, पपई, डाळिंब या फळवर्गीय पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने शेतकर्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेला शेतकरी पार खचून गेला आहे. पीक हातचे गेल्यामुळे वर्षभराची गुजरान कशी करावी व शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.
अवकाळी पाऊस व वादळी वार्यामुळे अनेकांच्या कच्च्या घरांची पडझड झाली आहे. महसूल व कृषी विभागाद्वारे या नुकसानीचा सर्व्हे करून नुकसान झालेल्यांना शासनाने तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जागर मंचच्या पदाधिकार्यांनी केली.