खेट्री : नजीकच्या सुकळी येथे गेल्या काही महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, ग्रामस्थांना भरउन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.पातूर तालुक्यातील सुकळी येथे गावात दोन हातपंप आहेत; परंतु त्यापैकी एका हातपंपाचे पाणी दूषित येत असल्यामुळे नाइलाजाने एकाच हातपंपावरून गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी रांगेमध्ये उभे राहून पाणी भरावे लागत आहे. पाण्याची टाकी तयार असून, पाण्याअभावी ती सात-आठ वर्षांपासून शोभेची वस्तू बनली आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करून टाकी व विहीर बांधून दिली होती. त्या टाकीमधून गावातील पाणीपुरवठा नियमितपणे सुरू होता; परंतु विहिरीवरील विद्युत पुरवठा वीज बिल न भरल्यामुळे वीज कंपनीने खंडित केला, तसेच गावातील पाइपलाइनसुद्धा जागोजागी फुटल्याने काही वर्षांपासून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. गावातील पाण्याचा दुसरा स्रोत नसल्याने शेतातून पाणी आणावे लागत आहे. एकच हातपंप असल्याने २४ तास हातपंपावर ग्रामस्थांसह महिलांची पाणी भरण्यासाठी एकच गर्दी असते. संबंधितांनी दखल घेऊन समस्या मार्गी लावण्याची मागणी होत आहे.
उन्हाळ्याच्या शेवटच्या आठवड्यात विहिरी अधिग्रहणउन्हाळ्याचे काहीच दिवस उरले असून, काही दिवसांतच पावसाळ्याला सुरुवात होत आहे. ग्रामपंचायतने उन्हाळ्याच्या शेवटच्या आठवड्यात दोन विहिरी अधिग्रहण केल्या, तेही फक्त कागदावर. त्यामुळे या अधिग्रहण केलेल्या विहिरीचे पाणी ग्रामस्थांना अद्यापही मिळाले नाही, असा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.
पाणीटंचाई दूर व्हावी, या उद्देशाने ग्रामपंचायतने गावातील दोन विहिरी अधिग्रहण केल्या आहेत. त्या विहिरीचे पाणी गावातील काही विहिरीमध्ये सोडणे सुरू केले आहे. लवकरच पाणीची समस्या दूर होईल.- जे. एस. ससाले, सचिव, सुकळी ता. पातूर.
ग्रामपंचायतने दोन विहिरी कागदावर अधिग्रहण केल्या आहेत. त्या विहिरीचे पाणी गावकऱ्यांना अद्यापही मिळत नाही. एकाच हातपंपावरून रात्रंदिवस पूर्ण गावाला पाणी भरावे लागत आहे.- अंबादास अंभोरे, ग्रामस्थ, सुकळी ता. पातूर.