धामणा येथे भीषण पाणीटंचाई
By Admin | Updated: May 12, 2014 20:01 IST2014-05-12T17:45:18+5:302014-05-12T20:01:45+5:30
नळयोजना महिनाभरापासून बंद

धामणा येथे भीषण पाणीटंचाई
धामणा: अकोला तालुक्यातील धामणा येथील नळयोजना महिनाभरापासून बंद पडल्यामुळे गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांना नाइलाजास्तव पूर्णा नदीचे दूषित पाणी प्यावे लागत असल्याने त्यांचे आरोग्यही धोक्यात आले असून, गावात विविध आजार बळावत आहेत.
धामणा येथे गोपालखेड पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणी पुरवठा करण्यात येतो. जवळपास सोळाशे लोकसंख्या असलेले धामणा हे गाव अकोला तालुक्याच्या टोकावर आहे. या गावाला पाणी पुरवठा करणारी गोपालखेड पाणी पुरवठा योजनेची जलवाहिनी २० वर्षे जुनी असल्याने ती जीर्ण झाली आहे. या जलवाहिनी अनेक ठिकाणी नादुरुस्त झाली आहे. अशा ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात या गळतीचे प्रमाण अधिकच वाढले आहे; परंतु अनेक ठिकाणी नादुरुस्त झालेली ही जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून सााहित्य उपलब्ध करून देण्यात कमालीची दिरंगाई होत आहे. त्यामुळे जलवाहिनीच्या दुरुस्तीस विलंब होत आहे. तथापि, ठिकठिकाणी नादुरुस्त झालेल्या जलवाहिनीतून होत असलेल्या पाण्याच्या गळतीमुळे वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी शेतात पाणी उपलब्ध होत आहे. तसेही धामणा येथे वर्षभर पाणीटंचाई असतेच; परंतु गावाजवळून वाहणार्या पूर्णा नदीच्या पाण्यावर येथील ग्रामस्थ आपली तहान भागवितात. यावर्षी पूर्णा नदीचे पाणीही दूषित झाल्याने ते पिण्यायोग्य राहिले नाही; परंतु नळयोजना महिनाभरापासून बंद असल्याने ग्रामस्थांना नाइलाजास्तव पूर्णा नदीचे दूषित पाणीच प्यावे लागत आहे. त्यामुळे गावात विविध आजारांनी डोके वर काढले आहे. कांजण्या, पोटदुखी, उलट्या, हगवण आदी आजारांची लागण झालेल्या रुग्णांमध्ये कमालीची वाढ झाल्याचे चित्र धामणा येथे दिसत आहे. या गावातील आठ ते दहा रुग्ण अकोला येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. धामणा येथील पाणीसमस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने आवश्यक पावले उचलावित, अशी मागणी गोपाल भांबेरे, मोहन भांबेरे यांच्यासह उपसरपंच अनिल भांबेरे यांनी केली आहे.