अकोला जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी

By Admin | Updated: June 19, 2015 02:54 IST2015-06-19T02:54:16+5:302015-06-19T02:54:16+5:30

सरासरी ३२.७ मि.मी. पाऊस; मूर्तिजापूरमध्ये सर्वाधिक पाऊस

Heavy showers in Akola district | अकोला जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी

अकोला जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी

अकोला- सार्वत्रिक पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी गुरुवारी सुखावला. मॉन्सूनच्या पावसाने संपूर्ण जिल्हा व्यापला आहे. बुधवारी मध्यरात्रीनंतर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ३२.७ मिलीमीटर पाऊस झाला. सर्वाधिक ७४ मि.मी. पाऊस मूर्तिजापूर तालुक्यात झाला. या पावसामुळे जिल्ह्यात पेरणीच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, बुधवारी रात्रीपासून संपूर्ण जिल्ह्याला मॉन्सूनने व्यापले आहे. मध्यरात्रीनंतर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर गुरुवारी दुपारीसुद्धा कायम होता. मूर्तिजापूर तालुक्यात अतवृष्टी झाली. गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत तालुक्यात ७४ मि.मी. पावसाची नोंद झाली. तालुक्यातील कुरुमसह अनेक गावाला पाण्याने वेढले होते. अकोल्यात २२ मि.मी. पाऊस झाला. अकोला तालुक्यात रामगाव येथे वीज पडून एकाचा मृत्यू झाला. बाळापूर तालुक्यात बुधवारी ८ मि.मी. पाऊस झाला असला तरी गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसाने खंडाळा, मांजरी, बारलिंगा, टाकळी, निमकर्दा आदी गावांमध्ये पाणी साचले होते. येथे ५0 हून अधिक घरांमध्ये पाणी शिरले. महादेव मगर, प्रकाश वानखडे, गजानन गिरी, बाळू पाटील, भीमराव पाटील, अंबादास मेहरे आदींसह अनेक गावकर्‍यांच्या घरात पाणी शिरले होते. बाश्रीटाकळी तालुक्यातही पावसाचा जोर कायम आहे. या तालुक्यात ३७ मि.मी.पाऊस झाला. तालुक्यात जून महिन्यातील पावसाची सरासरी ओलांडली आहे. १ जूनपासून तालुक्यात आतापर्यंत १७३ मि.मी. पाऊस झाला. आकोटमध्ये २९ मि.मी. पाऊस झाला. येथे १ जूनपासून आतापर्यंत १२३ मि. मी. पाऊस झाला आहे. तेल्हारा तालुक्यात ११ मि. मी. पावसाची नोंद झाली. पातूर तालुक्यातही पावसाने सरासरी ओलांडली असून, येथे १ जूनपासून आतापर्यंत १६८ मि. मी.पाऊस झाला. या तालुक्यात गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ४८ मि.मी. पाऊस झाला. मूर्तिजापूर तालुक्यातही पावसाने सरासरी ओलांडली आहे. या तालुक्यात १ जूनपासून आतापर्यंत १५७ मि.मी. पाऊस झाला आहे. जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी १३५.२ मि.मी.पाऊस पडतो, अशी नोंद हवामान खात्याकडे आहे. यावर्षी १८ जूनपर्यंत जिल्ह्यात सरासरी १२३.0१ मि.मी. पाऊस झाला आहे.

Web Title: Heavy showers in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.