गारपिटीकडे विभागीय आयुक्तांचा कानाडोळा
By Admin | Updated: January 3, 2015 01:28 IST2015-01-03T01:28:59+5:302015-01-03T01:28:59+5:30
पीक नुकसानीची घेतली नाही माहिती.
गारपिटीकडे विभागीय आयुक्तांचा कानाडोळा
संतोष येलकर / अकोला: जिल्हा दौर्यावर आलेल्या विभागीय आयुक्तांनी शुक्रवारी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेतली; मात्र अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यात झालेल्या पीक नुकसानीची माहिती घेतली नाही. त्यामुळे गारपिटीमुळे झालेल्या जिल्ह्यातील नुकसानीकडे विभागीय आयुक्तांनी कानाडोळा केल्याचा प्रत्यय आला. यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या परिस्थितीच्या पृष्ठभूमीवर अकोला शहरासह जिल्ह्यातील तीन प्रस्तावित पाणीपुरवठा योजनांसाठी मोका पाहणीकरिता अमरावती विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर शुक्रवारी अकोला दौर्यावर आले होते. योजनांच्या पाहणीपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकार्यांची बैठक घेऊन, प्रस्तावित पाणीपुरवठा योजना आणि त्यांची आवश्यकता, यासंदर्भात चर्चा केली. गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे हरभरा, गहू, कपाशी, ओवा, लिंबू व केळी इत्यादी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे आधीच नापिकीमुळे दुष्काळाच्या झळा सहन करणारा जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला. या पृष्ठभूमीवर अकोला दौर्यात विभागीय आयुक्त अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा जिल्हा प्रशासनाकडून घेतील, त्यासंदर्भात चर्चा करतील, अशी अपेक्षा होती. मात्र जिल्हा दौर्यावर आलेले विभागीय आयुक्तांनी केवळ पाणीपुरवठा योजनांसदर्भात लोकप्रतिनिधी आणि अधिकार्यांची बैठक घेतली. या बैठकीत आणि बैठकीनंतर अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा तर दूर साधी माहितीदेखील विभागीय आयुक्तांनी घेतली नाही. त्यामुळे अवकाळी पाऊस गारपिटीमुळे जिल्ह्यात झालेले नुकसान व त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकर्यांकडे विभागीय आयुक्तांनी कानाडोळा केल्याचा प्रत्यय आला. *विचारणाही केली नाही! जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यापूर्वी, बैठकीत किंवा बैठकीनंतर, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यात किती नुकसान झाले, यासंदर्भात विभागीय आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाच्या संबंधित अधिकार्यांना साधी विचारणाही केली नाही. तसेच याबाबत साधा उल्लेखदेखील केला नाही. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची माहिती घेण्याकडे आयुक्तांनी केलेल्या कानाडोळ्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.