वेळेवरच्या विषयात मंजूर ठरावांवर ९ फेब्रुवारीला सुनावणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:48 IST2021-01-13T04:48:02+5:302021-01-13T04:48:02+5:30
अकोला : जिल्हा परिषदेच्या १० डिसेंबर रोजीच्या सर्वसाधारण सभेत वेळेवरच्या विषयांत मंजूर करण्यात आलेल्या १८ ठरावांविरोधात विरोधकांनी विभागीय आयुक्तांकडे ...

वेळेवरच्या विषयात मंजूर ठरावांवर ९ फेब्रुवारीला सुनावणी!
अकोला : जिल्हा परिषदेच्या १० डिसेंबर रोजीच्या सर्वसाधारण सभेत वेळेवरच्या विषयांत मंजूर करण्यात आलेल्या १८ ठरावांविरोधात विरोधकांनी विभागीय आयुक्तांकडे दाखल कलेल्या अपिलावर मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयात सुनावणी घेण्यात आली असून, या प्रकरणात पुढील सुनावणी ९ फेब्रुवारी रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले.
गत १० डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ‘व्हिडीओ काॅन्फरन्सिंग’द्वारे घेण्यात आली. या सभेत विषयपत्रिकेवरील ६९ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तसेच अन्य दोन विषय प्रलंबित ठेवण्यात आले. तसेच वेळेवर घेण्यात आलेल्या विषयात विविध १८ ठराव मंजूर करण्यात आले होते. वेळेवरच्या विषयात मंजूर करण्यात आलेल्या ठरावांविरोधात जिल्हा परिषदेतील विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना सदस्यांनी अमरावती विभागीय आयुक्तांकडे धाव घेत अपील दाखल केले होते. त्यानुषंगाने जिल्हा परिषदेच्या सभेत वेळेवरच्या विषयात मंजूर केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करण्यास स्थगिती देण्यात येत असल्याचा आदेश विभागीय आयुक्तांनी दिला होता. या प्रकरणात मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आलेल्या सुनावणीदरम्यान जिल्हा परिषदेच्या प्रशासनासह अपीलकर्त्यांच्या वतीने विधिज्ञांमार्फत मांडण्यात आलेली बाजू नोंदविण्यात आली असून, या प्रकरणात पुढील सुनावणी ९ फेब्रुवारी रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्याचे निश्चित करण्यात आले.