गर्भलिंग निदान रोखण्याकरिता आरोग्य विभाग सरसावला!
By Admin | Updated: March 30, 2017 02:57 IST2017-03-30T02:57:54+5:302017-03-30T02:57:54+5:30
‘डीएचओं’नी घेतली बैठक; कायद्याचे पालन करण्याचे निर्देश.

गर्भलिंग निदान रोखण्याकरिता आरोग्य विभाग सरसावला!
अकोला, दि. २९- मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असतानाही, काही घटकांकडून या प्रयत्नांना छेद देण्याचा प्रयत्न होत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. स्त्री भ्रूणहत्या व गर्भलिंग निदान रोखण्यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सरसावला असून, याबाबतच्या कायद्यांचे कठोर पालन व्हावे, अशा सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार यांनी तालुका आरोग्य अधिकार्यांना तातडीने आयोजित केलेल्या बैठकीत दिल्या.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत आरोग्य सहायकास गर्भपाताच्या गोळय़ा विकताना पकडण्यात आल्याच्या पृष्ठभूमीवर डॉ. पवार यांनी सर्व तालुका आरोग्य अधिकार्यांची बैठक बोलावली. या बैठकीत आकोट, बाश्रीटाकळी, तेल्हारा, मूर्तिजापूर व पातूर येथील तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ. पवार यांनी ग्रामीण भागातील सर्व सरकारी व खासगी आरोग्य संस्थांमध्ये सर्व औषधी साठय़ाची नोंद अद्ययावत करण्यात यावी. गर्भपाताकरिता आवश्यक असणार्या औषधांची वैद्यकीय अधिकार्यांनी पडताळणी करावी, संशयित बाबींची माहिती त्वरित जिल्हा आरोग्य अधिकार्यांना कळवावी, अशा सूचना दिल्या.
आरोग्य विभागातील आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी यांनी शासकीय नोकरी व्यतिरिक्त कोणताही खासगी वैद्यकीय व्यवसाय करून नये. वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी खासगी व्यवसाय करीत असल्यास तालुका आरोग्य अधिकार्यांनी त्याबाबतची माहिती जिल्हा स्तरावर कळवावी, असे निर्देशही डॉ. पवार यांनी यावेळी दिले.