आरोग्य पथक ताफ्यासह रिधोर्यात दाखल
By Admin | Updated: September 6, 2014 00:03 IST2014-09-05T23:49:03+5:302014-09-06T00:03:45+5:30
लोकमतचा प्रभाव; मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक रिधोरा येथे पोहचले. उपाययोजनाबाबत मार्गदर्शन.

आरोग्य पथक ताफ्यासह रिधोर्यात दाखल
रिधोरा : मालेगाव तालुक्यातील रिधोरा येथे अज्ञात तापाची साथ पसरल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णने ५ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करताच, आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली. या वृत्ताची दखल घेत मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक गावात पोहोचून उपाययोजनेबाबत मार्गदर्शन केले.
रिधोरा गावातील प्रत्येक घरात अज्ञात तापाची लागण झालेले रुग्ण दिसत आहेत. गावभरात अज्ञात तापासह साथीचे आजार पसरले असतानाही संबंधित विभागाकडून नियंत्रणासाठी पावले उचण्यात आलेली नव्हती, हे ह्यलोकमतह्ण वृत्ताने वरिष्ठ यंत्रणेच्या निदर्शनात आणून दिले होते. या तापाने आजारी पडलेल्या काही रुग्णांना वाशिम येथे, तर काहींना अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. पावसाळय़ाच्या दिवसांत गावात पसरलेले घाणीचे साम्राज्य, दुषित पाणी पुरवठा व डासांमुळे गावात आजारांनी थैमान घातले आहे. यामध्ये मलेरिया, डायरिया आदि आजारांचाही समावेश असून, अज्ञात तापाची लागण झालेल्या रुग्णाच्या पेशींचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसत आहे. ५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास आरोग्य पथक रिधोर्यात दाखल झाले आणि घरोघरी जावून उपाययोजना केल्या. वापराच्या पाण्यात टेमिफॉस नावाचे औषध टाकून गावकर्यांना आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. आरोग्य पथकात आरोग्य सेवक सुनिल नप्ते, देशमुख, आरोग्य सेविका शिरसाट, जामकर, आशा स्वयंसेविका कांचन सावळे यांनी प्रत्येक घरी जावून तापेने ग्रस्त असलेल्या रुग्णांवर औषधोपचार केला. दुपारी २ वाजताच्या सुमारास मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. शेंडे, आरोग्य सहाय्यक बी.पी. दामोदर, राजू तिवारी यांनी देखील रिधोरा येथे भेट देवून पाहणी केली. तसेच औषधोपचाराबाबत मार्गदर्शन केले.
प्राथमिक आरोग्य केंद्राने ७ जुलै रोजीच ग्रामपंचायत रिधोराला लेखी पत्राद्वारे गटारे, उकिरडे व नाल्या साफ करुन घेण्याविषयी कळविले होते. मात्र, ग्रामपंचायतच्यावतीने त्यावर कोणतीच उपाययोजना केली नसल्याने डासांचे प्रमाण वाढत आहे, असा दावा आरोग्य विभागाने केला.