बर्फ कारखान्यातून घातक अमोनिया वायूची गळती!
By Admin | Updated: April 22, 2016 02:30 IST2016-04-22T02:30:35+5:302016-04-22T02:30:35+5:30
जठारपेठेतील नागरिक वायूच्या उग्र दर्पाने त्रस्त, पोलिसांत तक्रार.

बर्फ कारखान्यातून घातक अमोनिया वायूची गळती!
अकोला: जठारपेठेतील केला प्लॉट परिसरात असलेल्या बर्फ कारखान्यातून बुधवारपासून घातक स्वरूपाच्या अमोनिया वायूची गळती सुरू झाल्याने, नागरिक वायूच्या उग्र दर्पाने त्रस्त झाले आहेत. अमोनिया वायुगळतीचा परिसरातील नागरिकांच्या प्रकृतीवर परिणाम झाला असून, नागरिकांना मळमळ, उलट्यांचा त्रास होत आहे. याप्रकरणी त्रस्त नागरिकांनी पोलिसांत धाव घेतल्यानंतर गुरुवारी सायंकाळी सिव्हिल लाइन पोलिसांनी बर्फ कारखान्यात जाऊन पाहणी केली. जठारपेठेतील केला प्लॉट परिसरात दिवाण यांच्या मालकीच्या १९८१ पासून बर्फाचा कारखाना आहे. या कारखान्यातून अनेकदा अमोनिया वायूची गळती होते. हा कारखाना परिसरातून हलविण्याची नागरिकांनी अनेकदा मागणी केली; परंतु प्रशासनाने त्याकडे लक्ष दिले नाही. या ठिकाणी बर्फाच्या कारखान्यासोबतच वॉटर प्लान्टसुद्धा आहे. बुधवारपासून कारखान्यातून घातक अशा अमोनिया वायूची गळती सुरू आहे. ही गळती रोखण्यासाठी बर्फ कारखान्याच्या मालकाकडून कोणताही प्रयत्न झालेला नाही. गुरुवारी तर कारखान्यातून मोठय़ा प्रमाणात अमोनिया वायूची गळती सुरू झाली. अमोनिया वायूच्या उग्र दर्पाने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.