हर्र ऽऽऽ बोला महादेव!
By Admin | Updated: August 26, 2014 21:57 IST2014-08-26T21:57:57+5:302014-08-26T21:57:57+5:30
शिवभक्तीत न्हाऊन निघाली राजेश्वर नगरी

हर्र ऽऽऽ बोला महादेव!
अकोला : खांद्यावर पाणी भरलेल्या कावडी, शिवशंकराची पालखी, १७ कि.मी. चा पायी प्रवास, तरीदेखील चेहर्यावर उत्साह कायम. ढोल-ताशे व अत्याधुनिक डिजेचे संगीत व त्यावर थिरकणारे युवा शिवभक्त. गुलाल आणि फुलांची उधळण, यामध्ये न्हाऊन निघालेले शिवभक्त अशा उत्साहपूर्ण वातावरणात सोमवारी अकोला शहराचा सर्वात मोठा लोकोत्सव साजरा झाला. भक्ती आणि श्रद्धा यांचा अपूर्व संगम दर्शविणार्या या उत्सवामुळे संपूर्ण अकोला नगराला यात्रेचे स्वरूप आले होते. शेकडो पालख्या व कावडधारी लहान-मोठे मंडळे या उत्सवात सहभागी झाले होते. यामध्ये आकर्षणाचे केंद्र ठरली ती डाबकीरोडवासी शिवभक्त मंडळाची ४५१ हंडे व २0१ भोपळे लावलेली पालखी. अकोला शहराचे आराध्य दैवत राजराजेश्वर मंदिरात दरवर्षी मोठय़ा प्रमाणात श्रावण उत्सव साजरा केला जातो. श्रावणातील दर सोमवारी शिवभक्त श्रद्धापूर्वक जलाभिषेक करतात. श्रावणातील शेवटच्या सोमवारी १७ कि.मी. अंतरावर असलेल्या गांधीग्राम (वाघोली) येथून पूर्णा नदीचे पाणी कावडीने आणून राजेश्वराला जलाभिषेक केला जातो. सहा दशकापेक्षा अधिक काळाची परंपरा असलेल्या या कावड उत्सवात अकोलेकरांचा भरभरून सहभाग असतो. यावर्षी ३00 च्या वर लहान-मोठी पालखी मंडळे व ५00 च्या वर कावडधारी या उत्सवात सहभागी झाले होते. गांधीग्राम येथून पायी शिवभक्त खांद्यावर शिवशंकराची पालखी व कावड घेऊन आले. वल्लभनगर, उगवा फाटा, शिलोडा, आकोट फैल, रेल्वे पुलावरून शिवाजी पार्क, राजकमल चौक, गवळीपुरा, आकोट स्टँड, माळीपुरा चौक, उदय टॉकीज, जुना कापड बाजार, सराफा बाजार, दाणा बाजार, गांधी चौक, गांधी मार्ग, सिटी कोतवाली चौक, लोहा पूल, जय हिंद चौक मार्गे या सर्व पालख्या व कावडी राजेश्वर मंदिरात पोहोचल्या. पहिल्या क्रमांकावर असलेल्या मानाच्या राजेश्वर संस्थानची पालखी ठीक सकाळी ९.३0 वाजता राजेश्वर मंदिरात पोहोचली. ही पालखी वाहून आणणार्या शिवभक्तांनी राजेश्वराला जलाभिषेक केल्यानंतर एक-एक करीत सर्वच मंडळांनी पूर्णेच्या पवित्र जलाने राजेश्वराला अभिषेक केला. रात्री उशिरापर्यंत अभिषेक सुरू होता. कावड व पालखी घेऊन आलेल्या शिवभक्तांनी श्रद्धापूर्वक राजेश्वराचे दर्शन घेतले व जलाभिषेक केला. कावड घेऊन येणार्या शिवभक्तांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. अनेक सामाजिक व धार्मिक संस्थांनी शिवभक्तांना चहा, फराळ व भोजनाचे वाटप केले. राजकीय पुढार्यांनीदेखील ठिकठिकाणी पालखी व कावडधार्यांचे स्वागत केले.