धार्मिक स्थळावर हातोडा; आयुक्त अंधारात!

By Admin | Updated: May 19, 2017 01:18 IST2017-05-19T01:18:57+5:302017-05-19T01:18:57+5:30

अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांचा प्रताप

Hammer at Religious Place; In the darkness of the Commissioner! | धार्मिक स्थळावर हातोडा; आयुक्त अंधारात!

धार्मिक स्थळावर हातोडा; आयुक्त अंधारात!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरातील मुख्य रस्त्यालगतचे धार्मिक स्थळ पाडण्यासंदर्भात मनपा आयुक्तांच्या स्तरावर वेळोवेळी बैठक घेऊन निर्देश दिले जातात. मागील काही दिवसांमध्ये पश्चिम आणि उत्तर झोनमध्ये धार्मिक स्थळांवर केलेल्या कारवाईपासून खुद्द महापालिका आयुक्त अजय लहाने अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे. अतिक्रमण विभागातील संबंधित कर्मचाऱ्यांची हिंमत पाहता कोठेतरी पाणी मुरत असल्याच्या शंकेला वाव आला आहे. याप्रकरणी महापालिका आयुक्त अजय लहाने काय निर्णय घेतात, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, महापालिका प्रशासनाने २९ सप्टेंबर २००९ पर्यंत नियमबाह्यरीत्या खुल्या जागांवर उभारलेली धार्मिक स्थळे व त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मुख्य मार्गालगतच्या धार्मिक स्थळांना हटविणे अपेक्षित होते. मनपा आयुक्त अजय लहाने यांच्या सूचनेनुसार पहिल्या टप्प्यात ५४ धार्मिक स्थळांची यादी तयार करण्यात येऊन संबंधित स्थळे हटविण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात वाहतुकीला अडथळा होणाऱ्या व मुख्य रस्त्यालगतच्या २२२ धार्मिक स्थळांची यादी तयार करण्यात आली.
महापालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने शहरात मुख्य रस्त्यांचे निर्माण कार्य सुरू करण्यात आले. मुख्य रस्त्यांना अडथळा ठरणाऱ्या धार्मिक स्थळांना हटविण्याचे आयुक्त लहाने यांनी नगररचना विभाग आणि अतिक्रमण विभागाला आदेश दिले. धार्मिक स्थळे हटविण्यापूर्वी मनपा आयुक्तांच्या स्तरावर बैठक आयोजित करून संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना निर्देश दिले जातात; परंतु मागील काही दिवसांमध्ये प्रामुख्याने पश्चिम आणि उत्तर झोनमध्ये मनपा आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय धार्मिक स्थळांवर जेसीबी चालविण्यात आल्याचा प्रताप नगररचना विभाग आणि अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांनी केल्याचे समोर आले आहे.

आयुक्तांच्या आदेशाशिवाय कारवाई कशी?
शहरातील पश्चिम व उत्तर झोनमध्ये मुख्य रस्त्यांप्रमाणेच प्रभागातील अंतर्गत भागातील धार्मिक स्थळेदेखील उद्ध्वस्त करण्यात आल्याचे समोर आले आहे. जुने शहरातील डाबकी रोड परिसरातील गोंडपुरा भागात जाऊन मंदिरांची नासधूस करण्यात आली. सदर कारवाई करताना आयुक्तांचे आदेश नसल्याची माहिती आहे.

मनपाच्या जागेवरील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष का?
शहराच्या कानाकोपऱ्यात महापालिकेच्या मालकीच्या जागा आहेत. संबंधित जागांवर झेंडे, पूज्यनीय व्यक्तींच्या नावाचे फलक लावून अतिक्रमण थाटण्यात आले आहे. संबंधित अतिक्रमणाकडे मनपा प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. यासंदर्भात मनपा आयुक्त लहाने ठोस भूमिका घेणार का, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

Web Title: Hammer at Religious Place; In the darkness of the Commissioner!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.