अर्धा पावसाळा उलटला; जलसाठय़ांनी तळ गाठला!

By Admin | Updated: July 18, 2014 00:44 IST2014-07-18T00:39:55+5:302014-07-18T00:44:58+5:30

पश्‍चिम विदर्भात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची दाट शक्यता.

Halfwayback; Water closes the bottom! | अर्धा पावसाळा उलटला; जलसाठय़ांनी तळ गाठला!

अर्धा पावसाळा उलटला; जलसाठय़ांनी तळ गाठला!

अकोला : दीड महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर राज्यात सर्वदूर पावसाला सुरू वात झाली असली तरी, पश्‍चिम वर्‍हाड म्हणून ओळखल्या जाणार्‍या अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्हय़ांमध्ये मात्र अद्यापही पावसाने जोर धरलेला नसल्याने, या भागातील जलसाठय़ांनी तळ गाठला असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा सिंचन प्रकल्पात आजमितीस केवळ २१ टक्के जलसाठा शिल्लक आहे.
राज्यात १५ जूलैपासून सर्वदूर पावसाला सुरुवात झाल्यानंतर सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले असताना, हा आनंद पश्‍चिम विदर्भासाठी मात्र औटघटकेचा ठरला. या विभागातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हय़ात आतापर्यंत केवळ १ सेंटिमीटर पाऊस झाला आहे. परिणामी या विभागातील मोठ्या, मध्यम व लघू प्रकल्पांची पातळी झपाट्याने कमी होत आहे. अकोला शहराला पाणी पुरवठा करणार्‍या काटेपूर्णा सिंचन प्रकल्पात आजिमितीस १८.३४ दशलक्ष घन मीटर म्हणजेच केवळ २१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. पाऊसच नसल्याने या धरणाची पातळी झपाट्याने कमी होत आहे. याच जिल्हय़ातील मोर्णा या मध्यम प्रकल्पात ११.७४ दशलक्ष घन मीटर म्हणजे २८ टक्के, निर्गुणा प्रकल्पात २२ टक्के, तर उमा या मध्यम प्रकल्पात केवळ तीन टक्के जलसाठा शिल्लक आहे. या जिल्हय़ातील दगडपारवा प्रकल्पाची पातळी तर शून्यावर पोहोचली आहे. जिल्ह्यातील पोपटखेड व उमा प्रकल्पात अनुक्रमे दोन व तीन टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला जिल्ह्यातीलच वाण व यवतमाळ जिल्हयातील निम्न पूस या प्रकल्पांमध्ये प्रत्येकी ५0 टक्के जलसाठा शिल्लक आहे.
बुलडाणा जिल्हय़ातील नळगंगा या प्रकल्पात आजमितीस २0.७७ दशलक्ष घन मीटर म्हणजेच ३0 टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्याशिवाय जिल्ह्यातील ज्ञानगंगा प्रकल्पात ३९ टक्के, मस प्रकल्पात २५ टक्के, कोराडीमध्ये ४३ टक्के, तर पलढग या प्रकल्पात २0 टक्के जलसाठा उरला आहे. वाशिम जिल्हय़ातील सोनल व एकबुर्जी प्रकल्पांची स्थितीही गंभीर आहे. लगतच्या यवतमाळ जिल्हय़ातील पूस या मोठय़ा प्रकल्पात १९ टक्के जलसाठा शिल्लक असून, निम्न पूसमध्ये ५0 टक्के साठा आहे. त्याच जिल्ह्यातील सायखेडा प्रकल्पात ४२ टक्के, गोकीमध्ये २१ टक्के, वाघाडीमध्ये २८ टक्के, तर बोरगाव या मध्यम प्रकल्पात २४ टक्के जलसाठा उरला आहे.

Web Title: Halfwayback; Water closes the bottom!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.