दोन हजार ट्रॅक्टरमधील तुरीचे मोजमाप अधांतरीच!

By Admin | Updated: April 26, 2017 02:15 IST2017-04-26T02:15:42+5:302017-04-26T02:15:42+5:30

खरेदी बंद : तूर उत्पादक शेतकऱ्यांवर आली ताटकळत बसण्याची वेळ

Half-minute measurement of two thousand tractors! | दोन हजार ट्रॅक्टरमधील तुरीचे मोजमाप अधांतरीच!

दोन हजार ट्रॅक्टरमधील तुरीचे मोजमाप अधांतरीच!

अकोला : हमीदराने ‘नाफेड’द्वारे तूर खरेदी २२ एप्रिलपासून बंद करण्यात आली असल्याने, जिल्ह्यात पाच खरेदी केंद्रांवर गत दीड महिन्यापासून उभ्या असलेल्या १ हजार ९६३ ट्रॅक्टरमधील तुरीचे मोजमाप अद्याप अधांतरीच आहे. त्यामुळे तुरीचे मोजमाप केव्हा होणार, याबाबतची प्रतीक्षा करीत तूर उत्पादक शेतकऱ्यांना खरेदी केंद्रांवर ताटकळत बसण्याची वेळ आली आहे.
शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत प्रतिक्विंटल ५ हजार ५० रुपये हमीदराने नाफेडमार्फत तूर खरेदी करण्यात येत होती. जिल्ह्यात अकोला, बाळापूर व पातूर या तीन तालुक्यांसाठी अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती या एका खरेदी केंद्रावर तसेच अकोट, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी व तेल्हारा या चार ठिकाणी खरेदी केंद्रांवर नाफेडद्वारे तूर खरेदी करण्यात येत होती. खरेदी केंद्रांवर तुरीची आवक मोठ्या प्रमाणात होत असताना, तूर खरेदीची प्रक्रिया मात्र संथगतीने करण्यात आली. बारदान्याचा अभाव आणि कर्मचाऱ्यांची तोकडी संख्या असल्याने, गत २६ फेबु्रवारी रोजी खरेदी केंद्रांवर आलेल्या ट्रॅक्टरमधील तुरीचे मोजमाप करण्यात आले नाही. दीड महिना उलटूनही तुरीच्या मोजमापासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागली. तुरीचे मोजमाप केव्हा होणार, याबाबतची प्रतीक्षा शेतकरी करीत असतानाच शनिवार, २२ एप्रिल रोजी सायंकाळपासून नाफेडद्वारे तूर खरेदी बंद करण्यात आली.
नाफेडद्वारे तूर खरेदी बंद करण्यात आली असली, तरी जिल्ह्यातील पाचही खरेदी केंद्रांवर १ हजार ९६३ तुरीचे ट्रॅक्टर उभे आहेत. दीड महिन्यापासून खरेदी केंद्रांवर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरमधील तुरीचे मोजमाप केव्हा सुरू होणार, याबाबतची स्थिती अद्याप अधांतरीच आहे. त्यामुळे तुरीच्या मोजमापासाठी जिल्ह्यातील ‘नाफेड’च्या खरेदी केंद्रांवर ताटकळत बसण्याची वेळ तूर उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरमधील तुरीचे मोजमाप ‘नाफेड’मार्फत केव्हा सुरू करण्यात येणार, याबाबतची प्रतीक्षा तूर उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

‘नाफेड’मार्फत तूर खरेदी बंद करण्यात आली; मात्र अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात उभ्या असलेल्या ६३५ टॅ्रक्टरमधील तुरीचे मोजमाप बाकी आहे. त्यामुळे खरेदी केंद्रांवरील ट्रॅक्टरमधील तुरीचे मोजमाप तातडीने सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी ‘नाफेड’च्या मुंबई कार्यालयाकडे केली आहे.
-शिरीष धोत्रे, सभापती, अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती.

Web Title: Half-minute measurement of two thousand tractors!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.