दीड लाखावर शेतक-यांना पीक विम्याच्या निम्मी मदत!
By Admin | Updated: August 2, 2016 01:53 IST2016-08-02T01:53:57+5:302016-08-02T01:53:57+5:30
पीक विमा न काढलेले शेतकरी: ६0 कोटींचा प्रस्ताव.

दीड लाखावर शेतक-यांना पीक विम्याच्या निम्मी मदत!
संतोष येलकर / अकोला
गतवर्षी पीक विमा न काढलेल्या जिल्ह्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक १ लाख ७३ हजार शेतकर्यांना पीक विमा रकमेच्या निम्मी (५0 टक्के) मदत मिळणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील पीक विमा न काढलेल्या अशा शेतकर्यांच्या मदतीसाठी ६0 कोटी ३७ लाख ६२ हजार ६५८ रुपये निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तयार करण्यात आला आहे.
गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला होता. या पृष्ठभूमीवर पीक विमा न काढलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना पीक विमा रकमेच्या ५0 टक्के मदत देण्याचा निर्णय राज्य शासनामार्फत गत २ मार्च रोजी घेण्यात आला. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यात तहसील कार्यालयांमार्फत गतवर्षीच्या खरीप हंगामात पीक काढलेल्या आणि पीक विमा न काढलेले शेतकरी आणि पेरेपत्रकानुसार शेतकर्यांच्या पिकाचे क्षेत्र यासंबंधीची माहिती घेऊन अहवाल तयार करण्यात आले. तहसीलदारांमार्फत प्राप्त अहवालाच्या आधारे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत यासंबंधी जिल्ह्याचा अहवाल तयार करण्यात आला. त्यानुसार गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ६१ हजार १0२ शेतकर्यांनी १ लाख ४८ हजार ७२0 हेक्टर ९ आर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचा विमा काढला नसून, १२ हजार ७८९ शेतकर्यांनी ३३ हजार २८८ हेक्टर ३ आर क्षेत्रावरील कापूस पिकाचा विमा काढला नाही. जिल्ह्यातील एकूण १ लाख ७३ हजार ८९१ शेतकर्यांनी सोयाबीन व कापूस पिकाचा विमा काढला नसून, पीक विमा न काढलेल्या शेतकर्यांना पीक विमा रकमेच्या ५0 टक्के मदतीसाठी ६0 कोटी ३७ लाख ६२ हजार ६५८ रुपये निधी मागणीचा प्रस्ताव दोन दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. शासनाच्या मंजुरीनंतर जिल्ह्यातील पीक विमा न काढलेल्या कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना पीक विमा रकमेच्या ५0 टक्के मदत मिळणार आहे.