रुग्णालय राबविणार ‘हगणदारीमुक्त’ अभियान!
By Admin | Updated: August 7, 2014 22:53 IST2014-08-07T21:46:21+5:302014-08-07T22:53:10+5:30
सवरेपचारमधील शौचालयांचा बाहेरील व्यक्तींकडून वापर

रुग्णालय राबविणार ‘हगणदारीमुक्त’ अभियान!
अकोला: येथील वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयात असलेल्या शौचालयांचा रुग्णालयातील रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांव्यतिरिक्त आजूबाजूच्या परिसरातील २00 ते ३00 नागरिक वापर करतात. तसेच रुग्णालय परिसरात इतरत्र घाण करतात. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाच्यावतीने आता हगणदारीमुक्त अभियान राबविण्यात येणार आहे.
सवरेपचार रुग्णालयात विविध वार्डांमध्ये अनेक शौचालय व स्नानगृह आहेत. ही शौचालये व स्नानगृह रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या वापरासाठी बनविण्यात आली आहेत. शौचालयांची संख्या रूग्णालयातील रुग्णसंख्येच्या तुलनेत मुबलक आहेत. मात्र, दररोज सकाळी रुग्णांची शौचालय कमी असल्याची ओरड होते. रुग्णालयाच्या आजूबाजूने असलेल्या शौचालय व स्नानगृहांचा अन्य नागरिकच वापर करीत असल्याचे रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात आले आहे. सकाळी रुग्णालयाच्या बाहेरील २00 ते ३00 व्यक्ती शौचालयाचा वापर करतात. तसेच रुग्णालयातील खुल्या जागेत शौचास बसतात. रुग्णांच्यासोबत त्यांचे चार ते पाच नातेवाईक असतात. हे नातेवाईकही रुग्णालयातीलच शौचालय व स्नानगृहांचा वापर करतात. रुग्णालयात वीस ते पंचवीस भिकारी व मतीमंद नेहमीच असतात. रुग्णालयात कोणत्याही परिसरात शौचास बसतात. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत असून, रुग्णांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. ही बाब वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड यांच्या लक्षात आल्यावर यावर अंकुश मिळविण्यासाठी त्यांनी हगणदारीमुक्त अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
** दोन चमू ठेवणार लक्ष
हगणदरीमुक्त अभियानांतर्गत प्रशासनाच्यावतीने २५ जणांच्या दोन चमू तयार करण्यात येणार आहेत. या चमू पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत रुग्णालय परिसरात फिरून उघड्यावर शौचास बसणार्यांवर कारवाई करणार आहेत. तसेच या चमू रुग्णालयातील शौचालयांचा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांव्यतिरिक्त कुणी वापर करतो का? याची पाहणी करून त्यांच्यावरही कारवाई करणार आहेत.
** अवैधरीत्या पैसे उकळतात
रुग्णालयातील शौचालय व स्नानगृहांचा वापर करणार्यांकडून काही व्यक्ती अवैध पैसे वसुली करीत असल्याचे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राठोड यांच्या निदर्शनास आले. शौचास जाणार्याकडून पाच रूपये व स्नान करणार्याकडून दहा रुपये घेण्यात येत होते. रुग्णालय प्रशासनाकडून असा कोणताही ठेका देण्यात आला नव्हता. मात्र, काही नागरिक अनेक महिन्यांपासून अशाप्रकारे रुग्णांचे नातेवाईक व अन्य नागरिककांकडून पैसे उकळण्यात येत होते.