एका महिन्यात जाळला कोट्यवधीचा गुटखा
By Admin | Updated: January 20, 2015 00:44 IST2015-01-20T00:44:37+5:302015-01-20T00:44:37+5:30
अकोला जिल्ह्यातील अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाई.

एका महिन्यात जाळला कोट्यवधीचा गुटखा
अकोला - अन्न व औषध प्रशासन विभागाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने विविध ठिकाणी छापे घालून जप्त केलेला तब्बल ४६ लाख रुपयांचा गुटखा गुरुवारी जाळून नष्ट केला. एका महिन्यात दुसर्यांदा अन्न व औषध प्रशासन विभागाने गुटखा जाळला. या कालावधीत तब्बल एक कोटी रुपयांच्यावर गुटखा अन्न व औषध प्रशासन विभागाने नष्ट केला आहे. विभागाचे सहआयुक्त शरद एम. कोलते रुजू झाल्यानंतरच लाखो रुपयांचा गुटखा जाळण्यात येत आहे, हे विशेष.
राज्यात २0१३ पासून गुटखाबंदी केली आहे. गत दोन वर्षांपासून लागू असलेल्या गुटखाबंदीनंतरही मध्य प्रदेश व हैद्राबादमधून मोठय़ा प्रमाणात गुटखा आणला जातो. बंदीच्या काळात बाजारात त्याची अव्वाच्या सव्वा किंमत लावून गुटखा माफियांनी कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. गुटखाबंदी अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाने माफियांवर नजर ठेवून गुटखा जप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
तथापि, तोकड्या कर्मचारी वर्गामुळे त्यांना मोठय़ा प्रमाणात छापे घालून गुटखा जप्त करणे शक्य नव्हते. त्यामुळे पोलीस प्रशासन व अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त कारवाई केली. अशा विविध छाप्यांदरम्यान जप्त केलेला सुमारे ४६ लाख रुपयांचा गुटखा गुरुवारी मनपाच्या कचरा डेपोत जाळला असून, यापूर्वी ४५ लाख रुपयांचा गुटखा नोव्हेंबरमध्ये जाळण्यात आला होता. नोव्हेंबर महिन्यातील गुटखा जप्त करण्याच्या ६४ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यानंतर आता १६ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी बैदपुरा व सिंधी कॅम्पमसह दगडी पूल, मेडशीसह विविध ठिकाणांवरून ४६ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला होता. गुटख्याचा हा माल गत अनेक दिवसांपासून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात होता.
आवश्यक बाबींची पूर्तता केल्यानंतर हा गुटखा गुरुवारी जाळण्यात आला. यावेळी सहआयुक्त शरद कोलते, अन्न निरीक्षक नितीन नवलकार, प्रशांत अजिंठेकर, रावसाहेब वाकडे, राजेश यादव, सामाजिक कार्यकर्ते संजय देशमुख यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. कोलते रुजू झाल्यानंतरच अन्न व औषध प्रशासन विभागातील गुटखा जाळण्यात आला असून, यापूर्वी जप्तीतील गुटखा कोठे गायब व्हायचा, हा संशोधनाचा विषय आहे.