गुलाबराव गावंडे आणि पोलिसांमध्ये वाद
By Admin | Updated: September 28, 2014 01:50 IST2014-09-28T01:50:43+5:302014-09-28T01:50:43+5:30
उमेदवारी अर्ज भरण्या करता आले असता झाला वाद

गुलाबराव गावंडे आणि पोलिसांमध्ये वाद
अकोला : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्यावतीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांचा त्यांच्यासोबत पाच जण नेण्यावरून पोलिसांशी वाद झाला.
शनिवारी माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे दुपारी १ वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यकर्त्यांंसह अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारासह केवळ चारच जणांना आतमध्ये प्रवेश दिला जातो. गुलाबराव गावंडे यांच्यासोबत अकोला पूर्वचे शिवसेनेचे उमेदवार आमदार गोपीकिशन बाजोरिया, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, माजी आमदार दाळू गुरुजी, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख संग्राम गावंडे व आणखी दोन कार्यकर्ते आतमध्ये शिरले. त्यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. प्रवीण मुंढे यांनी गुलाबराव गावंडे यांना केवळ पाचच जणांना आतमध्ये जाता येणार, असे सांगितले. यावरून दोघांमध्ये वादावादी झाली. माजी आमदार दाळू गुरुजी व अन्य नेत्यांनी प्रकरण शांत केले. त्यानंतर उमेदवारासोबत आतमध्ये जाण्यासाठी आलेले आ. गोपीकिशन बाजोरिया व श्रीरंग पिंजरकर बाहेरच थांबले. पोलिसांनी लगेच परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.