पालकमंत्र्यांकडून अकोला जिल्हा कारागृहाची तपासणी
By Admin | Updated: April 15, 2015 01:46 IST2015-04-15T01:46:09+5:302015-04-15T01:46:09+5:30
अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील परिस्थितीचा आढावा.

पालकमंत्र्यांकडून अकोला जिल्हा कारागृहाची तपासणी
अकोला - नागपूूर कारागृहातून पाच कैदी फरार झाल्यानंतर राज्यभरातील कारागृहांची सुरक्षा धोक्यात आली आहे. याच पृष्ठभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मंगळवारी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात अचानक तपासणी केली. नागपूर कारागृहातील धक्कादायक प्रकार उजेडात आल्यानंतर राज्यातील कारागृह प्रशासनाचे डोळे उघडले आहेत. याबाबत जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी, तपासणी करण्यासाठी राज्याचे गृहमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मंगळवारी दुपारी कारागृहाला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील मोबाइल ज्ॉमर कार्यरत आहे किंवा नाही. याबाबत खातरजमा करून त्यांनी कारागृह अधीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्याकडून संपूर्ण कारागृहाची माहिती घेतली. कारागृहाचे कामकाज, रिक्त पदांचा आढावा व कारागृह प्रशासनाला असलेल्या अडचणींची माहिती त्यांनी जाणून घेतली. डॉ. पाटील यांनी कैद्यांच्या बरॅकलाही भेट देऊन सुविधा व इतर बाबींची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासोबत माजी आमदार जगन्नाथ ढोणे होते तसेच कारागृह अधीक्षक ज्ञानेश्वर जाधव, वरिष्ठ तुरुंगाधिकारी संजय गुल्हाने उपस्थित होते. कारागृह अधीक्षक जाधव यांनी महिला कारागृहाचे बांधकाम सुरु असल्याची माहिती देत त्यासाठी १६.४९ लाख रुपयांचे अनुदान मिळाल्याची माहिती दिली.